पुणे : कुष्ठराेग हा वयाने माेठया असलेल्या व्यक्तींमध्ये आपण पाहताे. मात्र, या आजारातून आता मुलेही सूटलेली नाहीत. राज्यात एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत एकूण 17 हजार नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये 6.80 टक्के म्हणजेच 1160 नवीन कुष्ठरोगी मुले आढळले आहेत. लहान मुलांमध्ये आढळणारा कुष्ठरोग हे या निर्मूलन मोहिमेसमोरील आव्हान असल्याचे तज्ज्ञांनी म्हणणे आहे.
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री जीवाणूमुळे होणारा एक जुनाट संसर्गजन्य रोग आहे. हा रोग त्वचेवर, नसा, श्वसनमार्गाच्या पृष्ठभागावर आणि डोळ्यांवर परिणाम करतो. यामध्ये अंगावर न खाजणारा तसेच संवदेना नसणारा, चिमटा घेतला तरी ताे न बसणारा लालसर चटटा येताे. काही वेळा जखमही हाेते. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार, भारतात कुष्ठरोगाचा प्रादुर्भाव दर 10 हजार लोकसंख्येमागे 0.4 इतका आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विशेष तपासणी मोहिमही राबवली होती. या विशेष मोहिमेत अवघ्या 16 दिवसांत 3 लाख 48 हजार संशयित रुग्ण तर 6 हजार 600 निदान झालेले रुग्ण आणि आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण चंद्रपूरमध्ये 487 इतकी असून, त्यापाठोपाठ पालघरमध्ये 442 रुग्णांची नोंद झाली आहे.
याबाबत सहसंचालक (टीबी) डॉ. सुनीता गोल्हाईत म्हणाल्या, की ‘वर्षभर कुष्ठरोगाचे नियमित निरीक्षण सुरु असते. विशेष मोहीमेमुळे गुप्त आणि संशयित रुग्ण शोधण्यात मदत होते. शरीरावर पांढरे चट्टे यांसारखी प्राथमिक लक्षणे, संशयित रुग्णांचे वैद्यकीय निदान आणि प्रयोगशाळेच्या चाचणीद्वारे डॉक्टरांकडून संसर्ग झाल्याचे निदान केले जाते. यानुसार औषधोपचार दिले जातात.’
साडेआठ काेटी नागरिकांची तपासणी ...
राज्याच्या आरोग्य विभागाकडून 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान 35 जिल्ह्यांमध्ये 8.35 कोटींहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. आपल्या विशेष कुष्ठरोग शोध मोहिमेद्वारे 6679 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात गेल्यावर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत 13 हजार 410 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.