पुणे : सदाशिव पेठेतल्या थरारक घटनेने शहरात खळबळ माजवली आहे. या घटनेत माथेफिरू या तरुणीवर हल्ला करताना धाडसाने पुढे जाऊन तिला वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. राजकीय नेते, अभिनेते, कलाकार यांच्याकडून या रियल हिरोंचे अभिनंदन केले जात आहे. तर काही ठिकाणी त्यांना सत्काराला बोलावले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा जिगरबाज तरुणांशी फोनवरून संवाद साधला आहे. फडणवीस यांनी कौतुकाची थाप देत लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील दोघांचेही अभिनंदन केले आहे. अशातच नेहमी चर्चेत असणाऱ्या प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलनेही ट्विट करत लेशपाल जवळगेचे कौतुक केले आहे.
''लेशपाल , तुझ्यामुळे एक जीव वाचला , तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे ! हि बातमी ऐकून मी घाबरून गेले खरंच तुझ्या धाडसाचे कौतुक वाटते , तू जीवनदान देण्याचे अमूल्य कार्य केले आहेस.'' असं तिने सांगितले आहे.
सदाशिव पेठेतील थरारक घटना पाहून अंगावर काटाच येतोय. तरुणी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत असताना शंतनू जाधव या माथेफिरूने तिचा पाठलाग करून कोयत्याने वार करून संपवण्याचा प्रयत्न केला. त्या घटनास्थळी तरुणीला वाचवण्यासाठी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील हे दोघे हिम्मत दाखवत पुढे आले आणि माथेफिरू तरुणाला पकडले. लेशपालने या थरारक घटनेत शंतनूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या अंगावर बॅग फेकण्याचे धाडस केले. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.
दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो
''पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी मोठ्या शिताफीनं धैर्य दाखवून एका तरुणीचा जीवघेण्या हल्ल्यातून जीव वाचवला, माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला. अशा काही तरुणांमुळे पुण्यात सौहार्दयाचं वातावरण आणि पुण्याची संस्कृती टिकून आहे. या दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो'', अशी फेसबुक पोस्ट अजित पवारांनी केली आहे.
तिच्यात आम्हाला बहीण दिसली आणि आम्ही झेपावलो
एक तरुणी 'वाचवा, वाचवा' असे ओरडत पळते... हातात कोयता घेऊन एक तरुण तिच्या मागे पळत असताे... कोयत्याचा पहिला वार तरुणीला वरच्या वर शिवून जातो आणि रक्ताच्या धारा सुरू हाेतात... तरुणी पायात पाय अडकून खाली पडते... आजूबाजूची माणसं तिला वाचवण्यासाठी पुढे येतात; मात्र त्यांच्यावर सुद्धा माथेफिरू कोयता उगारत असल्याने घाबरून पळतात... तरुणी पुन्हा उठून एका बेकरीत शिरण्याचा प्रयत्न करते, मात्र बेकरीचा मालक दुकानाचे शटरच बंद करतो... तरुणी हतबल होऊन दोन्ही हात डोक्यावर ठेवून जीवाच्या आकांताने ओरडत असते... तिच्यावर दुसरा वार होणार... तितक्यात लेशपाल जवळगे हा जिगरबाज तरुण माथेफिरू तरुणाचा हात धरतो आणि हर्षद पाटील त्याला मागून घट्ट धरतो. दिनेश मडावी हादेखील मदतीला आला, तेव्हा त्याच्या कपाळावर कोयत्याचा मूठ लागतो आणि तरुणी थोडक्यात बचावते. या सगळ्यात फक्त काही सेकंद मागेपुढे झाले असते तर आज ती तरुणी बचावली नसती. यावर लेशपाल म्हणताे ‘तिच्यात आम्हाला बहीण दिसली आणि आम्ही झेपावलो!’