लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या घेण्याचा निर्णय राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. जिल्ह्यात १३ तालुुक्यांतील ३ हजार ६४८ शाळांपैकी जवळपास ९७९ शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. तर शाळांचे समायोजन करण्यात आले आहे. यामुळे या शाळाही बंद होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्यातील २० पेक्षा पटसंख्या कमी असल्यास त्या शाळा बंद करण्याचा निर्णय विनोद तावडे शिक्षण मंत्री असतांना घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांचाही आढावा घेण्यात आला होता. २०१९-२० मध्ये जवळपास ९७९ शाळांमध्ये २० पेक्षा पटसंख्या कमी होती. यात सर्वाधिक शाळा या पुरंदर, मुळशी आणि पुरंदर तालुक्यात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या शाळा बंद होणार काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, या बाबत काही निर्णय झाला नाही. २०२०-२१ मध्ये काेरोनामुळे सर्व यंत्रणा साथरोग नियंत्रणाच्या कामात लागली. कोरोनामुळे लॉकडाऊन लावत सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामुळे वर्षभर शाळा या बंदच राहिल्या. दरम्यान या परिस्थितीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. १४ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन यंत्रेणेमार्फत पहिलीत प्रवेश मिळाला. शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. काही दिवसांपासून ५ ते पर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, वाढत्या कोरोनामुळे या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत.
--
या शाळा होणार बंद
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शाळा नं. ३, बारामती तालुक्यातील मेखळी येथील शेरे वस्ती शाळा नं. २, भोर तालुक्यातील पाले गावातील साळवेवाडी शाळा, हवेली तालुक्यातील बहुली गावातील भगतवाडी शाळा, इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील हनुमानवाडी शाळा तर निमसाखर येथील बर्गेवस्ती शाळा ही गेल्या वर्षी पटसंख्येअभावी बंद करण्यात आली आहे.
--
शिक्षकांचे काय ?
जिल्ह्यात सहा शाळा बंद झाल्या आहेत. यामुळे या शाळांतील शिक्षक अतिरिक्त होणार आहे. हे शिक्षक अतिरिक्त होणार असले तरी त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे काय ?
या शाळा बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. असे असले तरी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना जवळच्या शाळेत दाखल केले जाणार आहे. असे असले तरी गावातील शाळा बंद झाल्याने दुसऱ्या गावात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागणार आहे.
---
जिल्हा परिषदांच्या २० पेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय झाला असला तरी या प्रकारचे कुठलेही पत्र जिल्हा परिषदेला मिळालेले नाही. त्यामुळे या कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाही.
- सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद