लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच या रुग्णासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. रविवार देखील प्रशासनासाठी असाच उगवला. रात्री उशिरापर्यंत पुण्यासाठी केवळ १६४७ रेमडेसिविर आणि ऑक्सिजन ३०० मे.टन उपलब्ध झाला. एक-एक रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी आणि ५-१० मे.टन ऑक्सिजनसाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी प्रयत्न करत आहेत. सोमवारी सकाळीच रेमडेसिविरची किमान साडेचार हजार इंजेक्शन्स उपलब्ध होतील, अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येचा वेग काही प्रमाणात कमी होताना दिसत असला ,तरी हाॅस्पिटलमध्ये दाखल होणा-या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे जिल्ह्याची रेमडेसिविर इंजेक्शन्सची दररोज पाच हजारांपेक्षा अधिक मागणी असताना रविवारी केवळ १६४७ इंजेक्शन्स उपलब्ध झाले. तर ऑक्सिजन ३०० मे.टन उपलब्ध झाला. पुण्यासाठी दिवसाला सरासरी ३२०-३३० मे.टन ऑक्सिजनची गरज आहे. यामुळे सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन जिल्ह्यासाठी कसा उपलब्ध होईल यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.