पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणी साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असला तरी सध्या चारही धरणांत मिळून केवळ ३.२९ टीएमसी पाणी साठा आहे. गत वर्षी हाच साठा ७.८४ टीएमसी होता. पाऊस लांबल्यास पाणीटंचाईचे संकट ओढावण्याचा धाेका निर्माण झाला आहे.
जून महिन्यात गेल्या तीन दिवसांचा अपवाद वगळता खडकवासला धरण साखळीच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. आजवरच्या पावसाचा विचार केल्यास खडकवासला परिसरात १०.५ मिमी पाऊस झाला असून, हा पाऊस सरासरीच्या केवळ ६ टक्के आहे. दुसरीकडे यंदाचा उन्हाळा आजवरचा १२२ वर्षांमधील सर्वात प्रखर होता. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही जास्त झाले. राज्यात यंदा पूर्ण मॉन्सून पावसानेही पाठ फिरवली. परिणामी, धरण साठ्यांत अद्याप वाढ झालेली नाही.
मागील पाच वर्षांचा विचार करता, गेल्या वर्षी याच दिवशी ७.८४ टीएमसी इतका साठा होता. २०२० मध्ये हा साठा ५.८१ टीएमसी; तर २०१९ मध्ये हा साठा ३ टीएमसी होता. २०१९ व २०२० मध्ये ग्रामीण भागाला कालव्याद्वारे जादा पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे २०१९ ला याच दिवशी साठा कमी होता. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी असून, ग्रामीण भागाला पाणीपुरवठा न करताही पाणीसाठी कमी आहे. यंदाचा धरणसाठा गेल्या तीन वर्षांतील निचांकी आहे.
धरणातील पाणीसाठा
वर्ष टीएमसी
२०१७ २.८६
२०१८ ३.१५
२०१९ ३.००
२०२० ५.८१
२०२१ ७.८४
२०२२ ३.२९