पुणे: पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली झाडांवर संक्रांत येत आहे. मेट्रोसाठी, नदीकाठी सुशोभीकरण करण्यासाठी, रस्ता रुंदीकरण, टेकडीवर रस्ता बनविणे आदी कारणांसाठी झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा घाट पुणे महापालिकेने घातला आहे. त्याच्या विरोधात पुणेकर मात्र चांगलेच उभे ठाकले आहेत. गेल्या तीन वर्षांत १० हजारांहून अधिक झाडे कापली गेली आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला
शहरातील १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासाचे प्रस्ताव आहेत आणि ३५५ मध्यम व अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणात सुमारे ७००० हून अधिक झाडे धोक्यात येत आहेत. त्या झाडांना वाचविण्यासाठी पुणेकर एकत्र येत आहेत. पुणे महापालिकेच्या अनियोजित दृष्टिकोनामुळे शहरात अनेक समस्या निर्माण होत आहेत. कोणत्याही समस्या प्रभावीपणे सोडविण्याची शक्यता धुसर झाली असून, उलट पर्यावरणाचा ऱ्हास वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांनीच आता पुढे येऊन हा विकास आम्हाला नको, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
प्रदूषण वाढतेय, झाडं कमी
पुणे महापालिका झाडे तोडण्यासाठी लगेच परवानगी देते. परंतु, झाडं लावून ती मोठी करण्यावर भर मात्र देत नाही. एकीकडे शहरातील वाहनांची संख्या वाढतेय, बांधकामे वाढत आहेत. परिणामी, झाडं कमी कमी होतच आहेत आणि प्रदूषणाची पातळी वर वर जात आहे. यंदा थंडीमध्ये तर धोकादायक पातळीवर हवा आहे. तोच श्वास पुणेकर घेत आहेत. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
तीन वर्षांमध्ये सुमारे २५ हजार झाडे तोडण्यासाठी अर्ज आले
शहरात गेल्या तीन वर्षांमध्ये पुणे महापालिका केवळ झाडं तोडत आहे. त्यासाठी परवानगी देत आहे. दरवर्षी साधारणपणे दहा हजार झाडे तोडण्याची परवानगी मिळत आहे. कोरोनाच्या काळात ५ हजार झाडे तोडली गेली. गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे २५ हजार झाडे तोडण्यासाठी अर्ज आले. ही माहिती ‘आरटीआय’ माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या कागदपत्रांवरून समोर आली आहे. - चैतन्य केत, निसर्गप्रेमी.