पुणे : पुण्यात बुधवारी (१९ फेब्रुवारी) सायंकाळी साडेचार ते पावणेपाचच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५, शिंदे चाळ, संजय चौक, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ ( वय ३१ , शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी त्यांची नावे आहेत.
कोथरूड पोलिसांनी या आरोपींना धडा शिकवत त्यांची धिंड काढली आहे. या तिन्ही तिन्ही आरोपींना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांची जनमानसात व समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे दहशत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध साक्षीदार होण्यास अगर तक्रार देण्यास नागरिक समोर येत नसल्याने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी यांनी न्यायालयात केली होती. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एच. वानखेडे यांनी कोथरूडमध्ये भरदिवसा तरुणाला मारहाण करणाऱ्या एका टोळीशी संबंधित तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या आरोपींवर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम वाढविण्यात आले आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी दिला होता आदेश
सुशिक्षित तरुणाला विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्यांना सोडू नका. एवढेच काय, तर त्यांना वाचविण्यासाठी येणाऱ्यांविराेधातदेखील कडक कारवाई करावी, असे आदेशही माेहाेळ यांनी दिले आहेत. सोशल मीडियावर अनेकांचे रिल्स, फोटो व्हायरल होत असताना पुणे पोलिस डोळे झाकून बसलेत का? याबाबत पोलिसांनी आत्मपरीक्षण करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली