पुणे : नियोजित दौऱ्यानुसार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती अपेक्षित असतानाही त्यांनी महोत्सवाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली. ‘पिफ’च्या उद्घाटनप्रसंगी नव्हे तर किमान पुरस्कार सोहळ्यावेळी तरी ते ‘एंट्री’ करतील, या आयोजकांच्या आशेवरही तावडे यांनी पाणी फिरविले. शेवटी चित्रपट क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल मान्यवरांना दिले जाणारे पुरस्कार ज्युरींच्या हस्ते प्रदान करण्याची वेळ आयोजकांवर आली.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा विनोद तावडे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या अनुपस्थितीतच पार पडला. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंंगडी, सिटी प्राईड कोथरूडचे संचालक अरविंद चाफळकर, महोत्सव अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. तरीही डॉ. पटेल प्रास्ताविक आणि संवादातून वेळ मारून नेत होते. सत्काराला उत्तर देताना दिलीप प्रभावळकर म्हणाले, ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दलचा हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद होत आहे. महात्मा गांधी यांची भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती. गांधी सामान्य माणसांना समजले पाहिजेत, याच भावनेतून काम केले. लक्ष्मण यांच्या वतीने मुलाने मनोगत व्यक्त केले. ‘ये तो सचहै के भगवान है’ असे गाणे म्हणत मुलांनी त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला. महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सुमित राघवन व क्षितिज दाते यांनी केले. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात ग्लॅडिस फर्नांडेझ व संतोष अवतरामानी यांच्या टँगो नृत्याने झाली. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘डॅम किड्स’ हा गोन्जालो जस्टिनिअॅनो दिग्दर्शित स्पॅनिश चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविण्यात आला.उशिराच आले मंत्री : अखेर सहा वाजता सोहळा सुरूमहोत्सवाची उद्घाटन वेळ ४ वाजता सांगण्यात आली होती. मात्र पाच वाजले तरी उद्घाटनाचा पत्ता नव्हता. तावडे यांचे आगमन कधी होणार हे आयोजकांनाही निश्चित माहिती नव्हते. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने भारतरत्न भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार होते. त्यापूर्वी पिफच्या उद्घाटनाला येण्याचे त्यांनी आयोजकांना कबूल केले होते. मात्र ते पिफकडे फिरकलेच नाहीत. थेट सांस्कृतिक संचालनालयाच्या कार्यक्रमाला ते गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याबाबत आयोजक पूर्णत: अंधारातच होते. रसिकांना फार वेळ प्रतीक्षेत ठेवणे शक्य नसल्याने अखेर सहा वाजता नाईलाजाने सोहळ्याला सुरुवात झाली.