लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गवा पुणे शहरात आल्यानंतर त्याला आपले प्राण गमवावे लागले. या गव्याला पकडण्यासाठी योग्य नियोजन न झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही खूप धावपळ करावी लागली. त्यामुळे वन्यजीव शहरात आल्यानंतर त्यांना कसे रेस्कू करावे, याबाबतचे प्रशिक्षण रविवारी बावधन येथे घेण्यात आले.
वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी मुख्य वनसंरक्षक सुजय दोडल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, प्रभारी विभागीय वन अधिकारी संजय कडू, मयूर बोठे, आशुतोष शेडगे, वनपाल व वनरक्षक कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी डॅा. एच. एस. प्रयाग यांनी सर्वांना प्रशिक्षण दिले. नागरी क्षेत्रामध्ये बिबट्या, गवा व गवा वर्गातील प्राणी आले, तर त्यांना कशा पध्दतीने हाताळायचे याबाबत मार्गदर्शन केले. रेस्क्यू संस्थेच्या नेहा पंचमिया यांनी त्यांच्या कामाचे सादरीकरण केले.
शहरात येणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे उध्दभवणारे धोके तसेच वन्यप्राण्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी निश्चितच या प्रशिक्षणाचा फायदा होईल, असे राहुल पाटील यांनी सांगितले.