प्रशांत बिडवे
पुणे : गुरुकुलात राहून वारकरी संप्रदाय, परंपरेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शालेय शिक्षणासोबतच गुरुकडून कीर्तन, भजन, गायन यासह टाळ, पखवाज, मृदंग, वीणा आणि हार्मोनियम आदी वाद्य वादनाची कला आत्मसात करतात. यातून एक सशक्त संस्कारी पिढी घडण्यासह अनेक उत्तम कीर्तनकार, गायक, वादकही तयार होत आहेत आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय वाढण्यास मदत होत आहे.
आळंदी येथे आजमितीस सुमारे २५०-३०० गुरुकुल आणि वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यामध्ये सुमारे ५ हजार विद्यार्थी वसतिगृहात राहून वारकरी संप्रदायाचे पाठ गिरवत आहेत. या मुलांमध्ये विशेषतः मराठवाडा भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ऊसतोड कामगार यांच्या मुलांची राहणे आणि शिक्षणाची व्यवस्थाही यातून होत आहे. ही मुले शाळेत शिक्षण घेण्यासह पारंपरिक धोतर, सदरा, टोपी परिधान करणे, हरिपाठ वाचन, ज्ञानेश्वरीचे पारायण करणे यासह विविध वाद्य वंदन आणि भजन कीर्तनाचे धडेही गिरवत आहेत आणि आवडीनुसार या कलेत पारंगत होत आहेत. यातून मुलांना चांगल्या सवयी लागण्यासह संस्कार होतात त्यांची उत्तम जडणघडण होते, असे संस्थाचालक सांगत आहेत.
आळंदीमध्ये वारकरी गुरुकुल संस्था चालविणारे हभप योगेश ठोक म्हणाले की, साधारणपणे इयत्ता चौथी-पाचवीपासून मुले वारकरी गुरुकुलमध्ये राहण्यासाठी येतात. अगदी सुरुवातीला आम्ही त्यांना विविध संत, अभंग, हरिपाठ, वारकरी संप्रदाय आणि परंपरा काय आहे? याबाबत माहिती देतो. भजनी मालिका पाठांतर करून घेतो. वेळेवर उठणे, शाळेत जाणे, परत येणे, स्वतःची कामे स्वतः करणे, अभ्यास, स्वच्छता आदींबाबत धडे दिले जातात. हे शिक्षण देत असताना मुले त्यांच्या अंगातील कला आणि आवडीनुसार वारकरी संप्रदाय शिक्षण घेत घडत जातात. सुमारे ४-५ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर अनेक जण उत्तम भजन गायन, वादक, कीर्तनाची कला आत्मसात करतात.
गुरुकुलाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शालेय शिक्षणासह वारकरी परंपरा सशक्त होईल. मराठवाडा भागातील मुलांना पुण्यात शिक्षणाची संधी मिळेल मात्र, या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सोयीसुविधा पुरविणे आणि राज्य शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. -दिनकरशास्त्री भुकेले, संत साहित्याचे गाढे अभ्यासक