लाेकमत न्यूज नेटवर्कपुणे : नव्या मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता, याबाबत विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम आणि उपक्रम राबविण्याबाबत शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये करार करण्यात आला.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव मनीष जोशी यांनी सर्व राज्यांतील उच्च शैक्षणिक संस्थांचे कुलगुरू आणि प्राचार्यांना पत्र पाठविले. त्यामध्ये लाेकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेत तरुणांना प्राेत्साहित करून सहभाग वाढविणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक आयाेगाच्या वतीने ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन’ (एसव्हीईईपी) हा कार्यक्रम राबविण्यात येताे. त्याच धर्तीवर, मतदार शिक्षण आणि निवडणूक साक्षरता याबाबत विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विविध विद्याशाखांसाठी अभ्यासक्रम तयार करावा आणि त्याला श्रेयांक द्यावेत, अशा सूचना पत्रात नमूद आहेत.
विद्यार्थ्यांना देणार मतदान प्रक्रियेचे ज्ञानविद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती अवगत व्हावी, यासाठी इव्हीएम, व्हीव्हीपॅट, भारतीय निवडणूक आयोगाचे मोबाइल ॲप, बॅलेट युनिट, मतदान विभाग, कंट्रोल युनिट, पीठासीन अधिकारी, दोन मतदान अधिकारी, पोलिंग एजंट, मतदान कप्पे, नाेटा आदींबाबत शाळा, महाविद्यालयांत माेहिमा, तसेच उपक्रम राबवून शिक्षण द्यावे. तसेच, निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी ‘मॉक पोल’ म्हणजेच निवडणूक चाचणीही घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिन, २५ जानेवारी रोजी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांचे आयाेजन करावे. विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदार जागृती अभियान राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.