पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून २० जुलै पासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जाणार आहे. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा शासनाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी या मालिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने या मालिकेचे नाव ‘टिलीमिली’ असे ठेवण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) या संस्थेच्या सहकार्यातून आणि ‘एमकेसीएल नॉलेज फांउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ही शैक्षणिक मालिका सुरू केली जात आहे. राज्यातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांना दूरचित्रवाणी संचावर या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ‘टिलीमिली’ मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असणार आहे. त्यात मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील.
दररोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० एपिसोडमध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे एपिसोड प्रसारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘टिलीमिली’ मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल. कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल.
२० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तानिहाय दैनंदिन वेळापत्रक (रविवार वगळून)वेळ इयत्तास. ७.३० ते ८.०० आठवीस. ८.०० ते ८.३० सातवीस. ८.३० ते ९.०० अन्य कार्यक्रमस. ९.०० ते ९.३० सहावीस. ९.३० ते १०.०० पाचवीस. १० ते १०.३० चौथीस. १०.३० ते ११ तिसरीस. ११ ते ११.३० अन्य कार्यक्रमस.११.३० ते दु. १२ दुसरीदु. १२ ते १२.३० पहिली