भोसरी : थ्रीडी चित्रांद्वारे स्क्रीनवर अभासी वास्तव दर्शवणाऱ्या व्हर्च्युअल रिअॅलिटी या अद्ययावत तंत्राद्वारे विद्यार्थी धडे घेणार आहेत. इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेत ही अनोखी प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा प्रथम वापर करणारी प्रियदर्शनी ही शहरातील पहिली शाळा असल्याचा दावा या शाळेच्या व्यवस्थापनाने केला आहे.शिक्षण हा आयुष्याचा मूलभूत पाया आहे. शिक्षणाशिवाय सर्वकाही व्यर्थ आहे. सध्याच्या डिजिटल युगामध्ये ज्ञानाने सर्वसंपन्न होणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक गोष्ट ही अनुभव आणि त्याचा वापर याच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे या जगात टिकून राहायचे असेल तर परिपूर्ण शिक्षण घेणे आणि ते मिळणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रिअॅलिटी या एका वेगळ्या नावीन्यपूर्ण तंत्राचा अवलंब पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम प्रियदर्शनी ग्रुप आॅफ स्कूलच्या वतीने करण्यात येत असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला आहे.काय आहे व्हीआर तंत्रज्ञान?व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) या तंत्रज्ञानात त्रिमिती (थ्रीडी) तंत्राद्वारे संगणकावर चित्र तयार केले जाते. डोळ्यांसमोर स्क्रीन असलेले हेडसेट त्यासाठी वापरले जाते. हे उपकरण डोक्यावर बसवून डोळ्यांसमोरील स्क्रीनद्वारे डोळे पूर्ण झाकल्यामुळे आपण तिथे प्रत्यक्षात असल्याचा अनुभव या तंत्रज्ञानामुळे मिळतो. याद्वारे आपल्या दोन्ही डोळ्यांना वेगळे चित्र दिसत असले तरी मेंदूमध्ये अॅक्चुअल प्रतिमा तयार होताना दोन्ही चित्र एकत्र होऊन एक प्रतिमा दिसते. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे धडे प्रियदर्शनी शाळेकडून व्हर्च्युअल तंत्रज्ञानाद्वारे दिले जाणार आहे.>असा आहे प्रयोगएकादी माहिती पुन्हा पुन्हा हवी असेल तर ते आठवणे सोपे होते. या तंत्रज्ञानामुळे मुलांना शिकणे सोपे होते. यातून मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यास मदत होते. तसेच पाहणे, ऐकणे आणि अनुभवणे यामधून शिक्षण घेणे सोपे होते. जे आपण ऐकतो ते आपल्याला माहीत होते. जे आपण पाहतो ते आपल्या लक्षात राहते आणि जे आपण करून पाहतो ते आपणास समजते. या सर्व गोष्टींचा एकत्रित अनुभव म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी असल्याची माहिती प्रियदर्शनी स्कूलच्या वतीने देण्यात आली.
व्हर्च्युअल रिअॅलिटीतून विद्यार्थ्यांना धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:52 AM