मंचर : नवरात्रोत्सव सुरू असून काही तरुण कारण नसताना दुचाकीवरून वारंवार फेऱ्या मारतात. मंचर शहरात दुचाकीवरील दोघांनी आगाऊपणा केला. त्यांना महिलांनी चांगलाच धडा शिकविला आहे. महिलांच्या या रुद्रावताराची आज मंचर शहरात चर्चा होती.याबाबत समजलेल्या माहितीनुसार : नारोडी व घोडेगाव येथील काही भाविक महिला बोलेरो गाडीतून काळुबाईदर्शनासाठी गेल्या होत्या. काळुबाईदर्शन करून त्या रात्री माघारी परतल्या होत्या. सध्या नवरात्रोत्सव जोरात सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत दांडियाचे कार्यक्रम सुरू असतात. अशा वेळी काही तरुण जास्त उत्साहीपणा दाखवत दुचाकीवरून मोठा आवाज करीत इकडे तिकडे अकारण फिरत असतात. कारण नसताना उगाच फिरणाऱ्या या तरुणांचा आगाऊपणा अनेकांना खटकतो. कुणी हटकत नसल्याने तरुण सर्रास असे प्रकार करतात. काळुबाईवरून आलेल्या बोलेरो गाडीने मंचर शहरात प्रवेश केला. त्या वेळी असेच दुचाकीवरून दोघे जण वेगाने आले.बोलेरो गाडीने आपल्याला कट मारला, असे समजून दुचाकीवरील दोघांनी बोलेरोचा पाठलाग केला. पुणे-नाशिक महामार्गावर लक्ष्मी रस्ता सुरू होतो, तेथे दुचाकी बोलेरोला आडवी मारून थांबवली. या तरुणांनी बोलेरोचालकाला बाहेर खेचून मारण्यास सुरुवात केली. बोलेरोचालकाचा कोणताही दोष नाही, त्याला सोडा, असे गाडीतील महिला विनवून सांगत होत्या. मात्र त्या तरुणांनी ऐकले नाही. शेवटी महिला सतंप्त झाल्या. त्यांनी गाडीतून उतरून तरुणांना जाब विचारला. महिलांचा हा रुद्रावतार पाहून तरुण गांगरले व ते पळू लागले. या महिलांनी त्यांचा पाठलाग केला. दोघांना पकडून चोप देण्यात आला. महिलांचा रुद्रावतार पाहून हे तरुण घाबरले होते. पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे ते सांगत होते. काही ज्येष्ठ नागरिकांनी महिलांची समजूत काढून या तरुणांची सुटका केली. या घटनेमुळे सैराट झालेल्या तरुणांना काही प्रमाणात आळा बसेल, अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली. पोलिसांनी गस्त घालून बेशिस्त वागणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
रोडरोमिओंना महिलांनी शिकविला धडा
By admin | Published: October 11, 2016 1:46 AM