पुणे: महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यावर पुण्यात बॅनरबाजीला सुरुवात होते. कालच्या राजकीय घडामोडीनंतर पुण्यात पालखी प्रवेशाच्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे! असे विठ्ठलाकडे साकडं घालणारे बॅनर लावण्यात आले आहे. काल राज्यात एकनाथ शिंदे ३५ आमदारांसहित सुरतला गेल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार कि राहणार याबाबत तर्क वितर्कही लावले जात आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी आम्ही बाळासाहेबांच्या तत्वावर चालणारे आहोत. हिंदुत्व सोडणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेने एकत्र यावे असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना अधिकच वेग प्राप्त झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत आले आहे.
सध्या आषाढी वारी सुरु झाली आहे. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा केली जाते. परंतु कालच्या या घडामोडीनंतर दरवर्षी होणारी पांडुरंगाची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावी. अशी वक्तव्य भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. तर पुण्यात आज पालखी प्रवेश करणार आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे! असे विठ्ठलाकडे साकडं घालणारे बॅनर लावण्यात आले आहे. पालखी प्रवेशाच्या ठिकाणी हे बॅनर लावल्याने हा चर्चेचा विषय बनत आहे.
आमच्यासोबत ४६ आमदार
सकाळीच एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत सध्या ४० आमदार असल्याचे म्हटले होते. तसेच आणखी १० आमदार येतील असे म्हटले होते. आता दुपारी त्यांनी आपल्याकडे ४६ आमदार आल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सहा तासांत सहा आमदार वाढले आहेत. शिवसेनेचे दोन आणि अपक्ष तीन असे पाच आमदार सायंकापर्यंत गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. हिंदुत्व ही आमची भूमिका आहे. त्याच्याशी कदापीही तडजोड केली जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आपल्यासोबत ४६ आमदार आहेत, आणखी काही येत आहेत. आमचे सहकारी पक्षाचे आमदारही यात आहेत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.