प्रज्ञा केळकर-सिंग ल्ल घुमानसंतश्रेष्ठ नामदेव नगरी : साहित्याचा प्रवास हा कायमच बहुभाषिक राहिला आहे. साहित्य या शब्दाचा अर्थच एकता, एकजुटता असा होतो. जो प्रांत केवळ एकच भाषा अथवा अस्मिता जपतो, त्या प्रांतातील संस्कृती आणि भाषा लोप पावते. एकाच प्रादेशिक भाषेत अनेक भारतीय आणि परदेशी भाषांचा मिलाफ पहायला मिळतो. संमिश्र भाषा अधिक समृद्ध असते. त्यामुळे अस्मितेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या भाषेला बाहेर काढायला हवे, असे मत घुमान येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.संत शिरोमणी नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे पहिलेवहिले बहुभाषिक साहित्य संमेलन सरहद या संस्थेने आयोजित केले आहे. या उद्घाटन सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते संस्कृत भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक सत्यवत शास्त्री, ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, प्रा. वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ साहित्यिक सुरजित सिंग पातर, पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री सुरजित सिंग राखडा, गुरमित सिंग डग्गा, सरबजित सिंग बाबा, हरवंत सिंग, सुजिंदर संग लाली, गुलचरण सिंग बाबा, राजीव खांडेकर, भारत देसडला, स्वागताध्यक्ष अरुण नेवासकर, सरहदचे संजय नहार, राजन खान आदी उपस्थित होते.देवी म्हणाले, ‘सध्या राजकीय, सामाजिक स्तरांवर वाचाहीनता पोसली जात आहे. यामुळे संस्कृती, भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या संघर्षातून बाहेर पडून साहित्याकडे बहुभाषिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. भाषांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा, साहित्यिकांच्या या पिढीवर भाषा नामशेष होत असताना काहीही पावले न उचलल्याचा आरोप भविष्यात लावला जाईल.’सत्यवत शास्त्री म्हणाले, ‘आजच्या काळातील समाजातील प्रश्नांचे निवारण साहित्यातून होऊ शकते. भारत बहुभाषा आणि विविधतेने नटलेला देश आहे. अनेक संस्कृती आणि सभ्यतांनी देशाला समृद्ध केले आहे. भाषा हे विचारांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे भाषांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अनुवादाचे प्रमाण वाढले पाहिजे. प्रत्येक विद्यापीठामध्ये अनुवाद प्रकोश (ट्रान्सलेशन ब्युरो) निर्माण झाले पाहिजेत. अनुवादक हे विचारांचेही अनुवादक असतात. त्यामुळे त्यांची समिती नेमली जाऊन अनुवादाचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. कारण, अनुवाद हे एकतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.’सुरजित सिंग राखडा म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि पंजाबची फार पूर्वीपासून नाळ जुळलेली आहे. संत नामदेवांच्या कर्मभूमीत साहित्यिक उपक्रम राबवण्यास पंजाब सरकार कायमच अनुकूलता दाखवेल. या संमेलनाची उंची उत्तरोत्तर वाढण्यासाठी नेहमी सहकार्य मिळेल.’सुरजित सिंग पाथर म्हणाले, ‘प्रेम, शायरी, न्याय ही सुत्रे प्रत्येक पंजाबी आणि भारतीय माणसाच्या मनात रुजलेली आहेत. मनातील भावना प्रकट करण्यासाठी भाषेचा जन्म झाला. सध्या स्वार्थासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी भाषेचा वापर केला जातो. साहित्यिक हा मात्र मानवतेसाठी, ऐक्यासाठी लढत असतो. एक भाषा नष्ट झाल्यास एक पर्व संपते.’ भाषेत संस्कृती, संस्कृतीत राष्ट्राचे आणि राष्ट्रात विश्वाचे बीज रुजलेले आहे. संत नामदेवांनी ७०० वर्षांपूर्वी सांस्कृतिक अधिष्ठानाचे बीज रोवले. बहूधार्मिक, बहूभाषिक संस्कृती हे आपले संचित आहे. देशात आर्थिक, सामजिक असंतोष, असहिष्णुतेची लाट आली आहे. कोणताही साहित्यिक या परिस्थितीचे समर्थन करू शकत नाही. कारण साहित्याला केवळ एकात्मता कळते. विश्वाच्या ऐक्यासाठी लेखणीची ताकद अत्यंत महत्वाची आहे. लेखणीत परीवर्तनाची ताकद आहे. ही लेखणी कोणत्याही दहशतवादाला बळी पडणार नाही.- डॉ. श्रीपाल सबनीस ‘माणसाकडे श्रम करण्याची आणि भाषेची शक्ती आहे. सध्याच्या स्थितीत भाषेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी आपापला अहंकार बाजूला ठेवून इतरांची बाजू, समाज, परंपरा समजून घ्यायला हवी. जीवन सुंदर होण्यासाठी भाषा, साहित्याची गरज आहे. वारकरी ज्या ओढीने पंढरपूरची वारी करतो, त्याच ओढीने घुमानची साहित्यवारी होईल. ही परंपरा कायम राखली पाहिजे. - डॉ. सदानंद मोरे
अस्मितेच्या पिंजऱ्यातून भाषा मुक्त व्हावी
By admin | Published: April 04, 2016 1:13 AM