लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “राजू शेट्टी नाराज असतील तर त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. ‘राष्ट्रवादी’च्यावतीने जी यादी मुख्यमत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली त्यात सहकार, शेतीच्या क्षेत्रात शेट्टींनी जे योगदान दिले ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणानं केलं आहे,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठविले जाणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून चालू आहे. त्यांच्यासह अन्य अकरा जणांची यादी महाआघाडी सरकारने राज्यपालांकडे दिली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर शेट्टी यांचे नाव या यादीतून वगळले असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यात तथ्य नसल्याचे सांगत पवार यांनी यावरुन उठलेल्या वादगांवर पडदा टाकला. महापालिकेच्या शाळेच्या उद्घाटनानंतर पवार शनिवारी (दि.४) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
“आमदार नियुक्तीसंबंधीचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा हा निर्णय आम्ही घेतल्यानंतर या बद्दल अंतिम भूमिका राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की अशा प्रकारची विधाने कशी केली जातात,” असे म्हणत पवारांनी राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दलही नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, “आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केले. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचे असेल तर मला त्यावर भाष्य करायचे नाही. आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. राज्यपाल काय करताहेत त्याची आम्ही वाट बघतोय.”
चौकट
तारतम्य ठेवण्याचा सल्ला
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले, “फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील काही राज्यांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत. ईडीचा गैरवापर महाराष्ट्रापुरता सीमीत नाही.” भाजप, मनसे या पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनांबाबत त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने राज्य सरकारांना कोरोना साथीसंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यात आणखी काही दिवस खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. “अन्य घटकांची याबाबत काही मते असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र केंद्र सरकारच्या विचाराचे जे लोक राज्यात आहेत त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे,” असा चिमटा पवारांनी राज्यातील भाजपला काढला.