आळंदी : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेली सर्व संकटे दूर करून देवी सरस्वतीची मंदिरे असलेल्या शाळा व महाविद्यालये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून निघू दे ! असे साकडे श्रीज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने संतश्रेष्ठ माऊलींना घालण्यात आले.
तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची (ता. खेड) येथे श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त श्री ज्ञानेश्वर विद्यालयात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या नवव्या व बाराव्या अध्यायाचे पारायण कोविड नियमावलींचे पालन करत करण्यात आले. यावेळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर कीर्तन पुष्प वाहत प्रबोधन केले.
याप्रसंगी ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, मुख्याध्यापक प्रदीप काळे, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, शिक्षक - शिक्षिका आदिंसह विद्यार्थी, पालक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
दरम्यान कोरोनाच्या जागतिक संकटामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणामुळे मानसिक रुग्ण बनण्याच्या भीतीबरोबर काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर राहून वाईट मार्गावर जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे बालविवाह, व्यसनाधीनता अशा अनेक संकटांना खतपाणी मिळण्याचा धोका संभवतो आहे. त्यामुळे घातक संकटे दूर होऊ दे व पुन्हा नव्याने जनजीवन पूर्ववत होऊ दे, अशी विनवणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी करण्यात आली. ऑनलाइनचे थेट प्रक्षेपण विद्यालयातील तंत्रस्नेही अध्यापक राहुल चव्हाण व राजेंद्र सोनवणे यांनी केले.
११ आळंदी
आळंदीतील श्री. ज्ञानेश्वर विद्यालयात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचे पारायण करण्यात आले.