पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणेमेट्रोच्या 'ट्रायल रन'चे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर अमृता फडणवीसांनी देखील राज्य सरकारला पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून जोरदार टोला लगावला होता. पण आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोची 'ट्रायल रन' कोणाच्याही हस्ते होऊ द्या, मात्र, उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्तेच होणार असल्याचे स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी( दि. ७) दुपारी महामेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी शिवाजीनगर येथील मेट्रोच्या नियोजित स्थानकावर दाखल झाले. यावेळी त्यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर उपस्थित पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले,महामेट्रोच्या 'ट्रायल रन' चे उद्घाटन राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यात काही गैर नाही. ते पुणे जिल्याचे पालकमंत्री देखील आहेत. या मेट्रोत केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मेट्रोचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे अशीच आम्हा सर्वांची इच्छा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महामेट्रोला २०१६ साली केंद्राने मंजुरी दिली . त्यानंतर २०१७ साली त्याची स्थापना झाली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या संदर्भात खूप बैठका घेत मेट्रोचा विषय मार्गी लावला असेही फडणवीस यांनी सांगितले.
काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अमृता फडणवीसांचा निशाणा पुण्यात अमृता फडणवीस एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मतं व्यक्त केली. तसेच पुणे मेट्रोच्या श्रेयवादावर भाष्य करतानाच राज्य सरकारच्या कामकाजावरही जोरदार टीका केली. पुणे मेट्रोच्या 'ट्रायल रन' उद्घाटनावरून अमृता फडणवीसांनी '' काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात'' अशा शब्दात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
चंद्रकांत पाटलांनी पुणे मेट्रोला सुनावले होते खडे बोल
पुणे मेट्रोच्या श्रेयवादावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम मेट्रो कंपनीला खडे बोल सुनावले होते. यावेळी त्यांनी पुणे मेट्रोचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली काम करायचं असेल तर आम्हालाही दबाव टाकता येतो. मोदींनी सर्व परवानग्या दिल्या, केंद्राने ११ हजार कोटी दिले आणि मोदींचा साधा फोटोही नाही ? आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्हाला सगळं फुकट हवंय. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन मी नाही तिथे? यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला होता.