पुणे: राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला असून, नवीवी ते बारावीचे वर्गही सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र, महाविद्यालायीन विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून आम्हालाही कॉलेजमध्ये जाऊ द्या, अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने कोरोनाबाबत आवश्यक खबरदारी घेवून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. नववी ते बारावीनंतर आता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सुध्दा आता शाळेत जाणार आहेत. त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये केव्हा जाणार ? असा सवाल महाविद्याललयीन विद्यार्थी विचारत आहेत.तसेच उच्च शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालय सुरू करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
दररोज महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेण्याचा अनुभव ॲानलाइन शिक्षणात घेता येत नाही. तसेच मित्र-मैत्रिण भेटत नाहीत. त्यामुळे आता अनेक विद्यार्थी घरी बसून कंटाळलेले आहेत. त्यांना महाविद्यालयात जाण्याची आस लागली आहे.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत उच्च शिक्षण विभागाने दाखवलेली तत्परता महाविद्यालय सुरू करण्याबाबतही दाखवावी. शासन आणखी किती दिवस महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचे घोंगडे भिजत ठेवणार ? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांची आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परिपक्वता विचारात घेता आता महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत.विद्यार्थ्यांचे अधिक शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी तात्काळ महाविद्यालये सुरू व्हावीत.
-------------
पाचवी ते बारावीचे विद्यार्थी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जातात आणि महाविद्यालयीन विद्यार्थी जात नाहीत. हे संयुक्तिक नाही.घरी बसून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता शासनाने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घ्यावा. -प्रा. नंदकुमार निकम , ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
------------------------------------------------
विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाला महाविद्यालये सुरू व्हावीत,असे वाटत आहे.कोरोनानंतर महाविद्यालये वगळता सर्व काही सुरू झाले आहे.त्यामुळे महाविद्यालये सुध्दा सुरू झाली पाहिजेत,असे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या मनात केव्हा येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ