पुणे : गणेशोत्सवाच्या काळात चार दिवसांव्यतिरिक्त आणखी एक दिवस पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव पुण्याच्या जिल्हाधिकाºयांनी पर्यावरण विभागाच्या संचालकांकडे पाठविला आहे. त्यास मान्यता मिळाल्यास यावर्षी गणेशोत्सवात पाच दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक सुरू ठेवणे शक्य होणार आहे.ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम २००० नुसार १५ दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक सुरू ठेवता येतात. त्यापैकी चार दिवस गणेशोत्सवात परवानगी दिली जाते. गणेशोत्सवामध्ये दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाते. जिल्ह्यातील गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत २६ जुलै रोजी बैठक घेण्यात आली होती.या बैठकीत शिल्लक असलेल्या दोन दिवसांपैकी एक दिवस हा अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवसासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पर्यावरण विभागाकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे. तसेच गणेशोत्सवात शेवटच्या चार दिवसांतगणपती आणि आरास पाहण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे आणखी एक दिवस मिळावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात पाच दिवस ध्वनिक्षेपक वापरू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:29 AM