पुणे : तुमच्याकडे शौचालय नसेल आणि तुमच्या मुलानेच पत्राद्वारे तुम्हाला स्वच्छतेचे धडे दिले, तर नामुष्की मानू नका! कारण, आता जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीच स्वच्छतादूत म्हणून काम पाहणार आहेत... अशा ३२ प्रकारच्या उपाययोजना मांडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी आता ‘एकच ध्येय- जिल्हा हगणदरीमुक्त’ असे ठोस आश्वासन गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले. जिल्हा हगणदरीमुक्तीच्या आतापर्यंत भरपूर घोषणा झाल्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: ही घोषणा केली; मात्र अद्याप जिल्हा हगणदरीमुक्त झाला नाही. आजच्या घडीला १ हजार २४ ग्रामपंचायती व १ लाख २८ हजार १४५ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. यात सर्वांत अस्वच्छ तालुका इंदापूर असून, मुळशी हगणदरीमुक्त झाला आहे.केंद्र शासनाने ‘स्वच्छ भारत’ अभियान हाती घेतले असून, १२ मे २०१६ रोजी पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या सचिवांनी २०१६-१७ वर्षात आपला जिल्हा हगणदरीमुक्त करायचा आहे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आपण या बाबीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असून, आपली सर्व शासकीय यंत्रणा त्यात समाविष्ट करून सर्व ग्रामपंचायतींना तशा सूचना द्या, आराखडा तयार करून तशी अंमलबजावणी सुरू करा, असे कळविले आहे.या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुरुवारी आपला आराखडा पत्रकारांसमोर मांडला. ‘निश्चय दि. ३१ डिसेेंंबर २०१६’ या शीर्षकाखाली त्यांनी हा आराखडा तयार केला असून, त्यात हगणदरीमुक्तीसाठी ३२ प्रकारच्या उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील लोकांची अद्याप तशी मानसिकताच झालेली नसल्याचे सांगून प्रथम ती तयार करणे, हे महत्त्वाचे काम असल्याचे देसाई यांनी या वेळी सांगितले. फक्त सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता त्यांनी या मोहिमेत जिल्ह्यातील कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची मदत घेणार असल्याचे सांगितले.विद्यार्थीसुद्धा या मोहिमेत स्वच्छतादूताचे काम करणार असून, आपल्या पालकांना पत्र पाठवून स्वच्छतेचे धडे देतील व शौचालय बांधण्यासाठी त्यांना तयार करणार आहेत. (वार्ताहर)भोर-वेल्हे हगणदरीमुक्त घोषणा १५ आॅगस्टलामुळशी तालुका हगणदरीमुक्त झाला असून, १५ आॅगस्ट रोजी भोर व वेल्हे हे तालुके हगणदरीमुक्त झाल्याची घोषणा आम्ही करू, असा विश्वास देसाई यांनी या वेळी व्यक्त केला. या दोन्ही तालुक्यांत ९० टक्क्यांपर्यंत काम झालेले आहे. फक्त १० टक्के काम बाकी असून ते प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. भोर तालुक्यात ३१ हजार ३१३ कुटुंबे असून, त्यांतील २९ हजार ७१३ जणांकडे शौचालय आहे. फक्त १ हजार ६०० कुटुंबे बाकी आहेत. वेल्हे तालुक्यात ११ हजार २०१ कुटुंबे असून १० हजार ८२१ जणांकडे शौचालय आहे. फक्त ३८० कुटुंबे तेथे बाकी आहेत.
चला, जिल्हा स्वच्छ करू या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2016 12:34 AM