लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “केंद्र सरकारचे महागाईवर कसलेच नियंत्रण राहिलेले नाही. सामान्यांचे जगणे हैराण झाले आहे. सरकार झोपले आहे, आमच्या आंदोलनाने त्यांना आम्ही जागे करू आणि गादी सोडायला भाग पाडू,” असे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगितले.
प्रदेश काँगेसच्या आदेशानुसार शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी आंदोलन झाले. रस्त्यावर स्वयंपाक करून महिलांंनी केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनाला भेट दिली असता कदम बोलत होते. महिला आघाडी शहराध्यक्ष सोनाली मारणे, शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, नगरसेविका लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, पूजा आनंद आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
छाया जाधव, शर्वरी गोतावने, रजिया बल्लारी, शारदा वीर, ज्योती अरवेन, नलिनी दोरगे, कविता गायकवाड, ललिता जगताप, मोना गायकर, रसिका भगवाने, सीमा महाडिक, वैशाली रेड्डी आदींनी चुलीवर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना महागाईविरोधात निवेदन देण्यात आले.