खूप पालक हा प्रश्न आम्हा शिक्षकांना विचारतात की, आता ऑनलाइन शाळा संपली विद्यार्थी सुट्टीमध्ये काय करणार? आम्हीसुद्धा वर्क फ्रॉम होम आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये या बालचमूंना कसे बिझी ठेवायचे हा प्रत्येक पालकाचा मोठा प्रश्न असतो.
पण, मी यावर असे म्हणेल की, आपण परत एकदा आपल्या बालपणामध्ये जावे आणि आपल्या लहानपणी आपण जसे बालपण मनापासून एंजॉय केले तसे बालपण या विद्यार्थ्यांना या बालचमूंना देण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. परत एकदा आठवा तर! ती लगोरी, विटीदांडू, लपंडाव ,पत्त्यांचा बंगला, काचकमळ, सागर गोटे, ॲपलचंपल, लंगडी, चप्पी असे कितीतरी खेळ आपण खेळत असू. दुपारच्या वेळेला आपण घरातले कितीतरी खेळ विद्यार्थ्यांबरोबर खेळू शकतो अगदी सांगायचे झाले तर आज काच कमळ किंवा पत्त्यांचा बंगला यातून आपल्या आईबाबांनी आपल्या आजी-आजोबांनी आपल्याला मनाची एकाग्रता कशी ठेवायची हे शिकवले. सागरगोटेमुळे सुद्धा आपल्याला टाईम मॅनेजमेंट बरोबर कळते. लगोरीमध्ये आपल्याला नेम कसा रोखायचा, नेम कसा ठेवायचा, नजर कशी तीक्ष्ण ठेवायची हे आपल्याला समजते. घर छोटे असले, तरी दोघात-तिघात रस्सीखेच सारखे खेळही खेळता येऊ शकेत ज्यातून स्थिरता, ताकद आणि एकाग्रता सारख्या गोष्टी वाढीस लागतील. असेच छोटे छोटे खेळ आपण या बालचमूंन बरोबर खेळू शकतो. फक्त एकच विनंती की आपल्याला आपल्या लहान वयात परत एकदा जावे लागेल. आजकालच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा खूप लोड दिला जातो. आपले बालपण आठवा आणि आताच्या मुलांचे बालपण, ही मुलं प्रॅक्टिकल होत चालली आहे. असं मला वाटतं. या मुलांमध्ये प्रेम, भावना, जिव्हाळा, माया, आपुलकी, शिस्त, संस्कार आपणच रुजवायला पाहिजे.
ही छोटी मुलं हल्ली आपलं आपलं राहणं पसंत करतात. त्यांच्याशी संवाद साधून आपण आपल्या घरातील जबाबदाऱ्या त्यांच्याशी बोलल्या पाहिजे फक्त घरातल्या आईबाबांचे कर्तव्य घर सांभाळण्याचे नाही तर घरातील प्रत्येक सदस्याचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी आपली जबाबदारी सांभाळून एकमेकांना सांभाळून, साथ देऊन, जबाबदारी, कर्तव्य पाळले पाहिजे त्यांच्या समोर बोलताना आपण नकारात्मक न बोलता सकारात्मकच बोलले पाहिजे. घरातील प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्यांना लहान वयात आदर शिकवू शकतो.
या corona काळात याने आपल्याला खूप काही शिकवले. किंबहुना आज हा मनाचा गॅप आपल्यासाठी आवश्यक होता असे मला वाटते.
यामुळेच माणसाला माणसाची खरी किंमत कळाली. याच तर भावना आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा आहेत. मिळालेल्या मोकळ्या वेळेमध्ये छान छान गोष्टी आपण जर या विद्यार्थ्यांना सांगितल्या काही स्वतःचे अनुभव जर सांगितले तर आपल्या मध्ये आणि आपल्या पाल्यामध्ये खूप छान बॉण्डिंग तयार होऊ शकते आणि हीच ती आता योग्य वेळ आहे. म्हणून आपण शांत राहून संयमी राहून बाहेरच्या परिस्थितीला तोंड देऊन हा वेळ जास्तीत जास्त आपल्या पाल्यांना देऊन त्याचा नक्कीच छान सदुपयोग करू!!!!!!
--
फोटो १ - रस्सीखेच कार्ट
फोटो -२ अनघा दातार