पुणे : मुंबईनंतर पुणे शहर सर्वांत झपाट्याने विकसित होत असलेले शहर आहे. त्यामुळे केवळ रस्ते, पाणी, ड्रेनेज यामध्ये अडकून न पडता शहराला अधिक देखणे करावे, सुंदर करावे. शहरे विकसित होत असताना नागरिकांची सोय आणि शहराचे सौंदर्य अबाधित राहायला हवे. पुणे देशातील देखणे व्हावे अशी, अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या उड्डाणापुलाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेता गणेश बिडकर, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह स्थानिक नगरसेवक, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
नेहरू रस्त्यावर सेव्हन लव्हज चौक ते मार्केट यार्डापर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत होती. ही कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या पुलामुळे नागरिकांना थेट वखार महामंडळ चौकात जाता येणार आहे. नागरिकांच्या सोई-सुविधा आणि विकासाकामांसाठी तत्पर असल्याचे भिमाले या वेळी म्हणाले. प्रभाग अध्यक्ष चेतन चावीर यांनी आभार मानले.