मंचर : बिबट्याची परिसरात दहशत असताना वारंवार मागणी करूनही वनखाते पिंजरा लावत नव्हते. अखेर गावचे सरपंच व ग्रामस्थांनी बिबट्या जेथे येतो तेथेच रात्री मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि मग वन खात्याला जाग आली. धामणी येथे पिंजरा लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी झोपण्याचा निर्णय रद्द केला आहे. आज दुपारी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या बागायती क्षेत्रात बिबट्याचा वावर व हल्ले वाढले असतानाच आता जिरायती व दुष्काळी भागातही बिबट्याने थैमान घातले आहे. ग्रामस्थांनी वनखात्याला वारंवार विनवण्या करूनही वनखाते दुर्लक्ष करत असल्याने अखेर ग्रामस्थांनीच अजब निर्णय घेऊन बिबट्या जेथे नेहमी येतो त्या ठिकाणी मुक्कामी झोपण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या वेगळ्या आंदोलनाने वन खात्याला जाग आली आहे.
आंबेगाव तालुक्यात नदी परिसर व डिंभे उजवा कालवा परिसरात मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र असल्याने या परिसरात बिबट्याने वास्तव्य केले आहे. मात्र आता बिबट्याने जिरायती भागात देखील पशुधनावर मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरु केले. मागील महिनाभरापासून धामणी, पहाडदरा परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होऊ लागले. त्यामुळे धामणी गावचे सरपंच सागर जाधव यांनी वनखात्याला वारंवार विनवणी करून पिंजरा बसविण्याची मागणी केली मात्र वनखात्याने त्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासकाठी अखेर धामणी येथील सागदरा येथे बिबट्या वारंवार येत असल्याने त्याच ठिकाणी रात्री झोपण्याचा निर्णय सरपंचांनी जाहीर केला. हा निर्णय वनखात्याला कळताच कधीच वेळेवर न येणारे वनखात्याचे वनरक्षक सोपान आनासुने व कर्मचारी तत्काळ काल रात्री साडेदहाच्या सुमारास तत्काळ घटनास्थळी हजर झाले. सरपंच व त्यांचे अनेक सहकारी झोपण्याच्या तयारीत असताना वनखात्याने सकाळी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याठिकाणी झोपण्याचा निर्णय रद्द केला.
याप्रसंगी सरपंच सागर जाधव, युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय राजे विधाटे, संजय जाधव, योगेश जाधव, जालिंदर जाधव, सोनाजी जाधव, बापू जाधव, पप्पू देशमुख, अजय पडवळ, ओम जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने दुपारच्या सुमारास पिंजरा लावला असल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी दिली. त्यानंतर त्यानी सरपंचांना भेट देऊन याबाबत चर्चाही केली.