पुणे : ‘मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेतील एका ओळीचा चुकीचा अर्थ लावून कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहे. लेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य ही चिंतेची बाब आहे’, अशी नाराजी व्यक्त करत, ‘कवितेसंदर्भात निर्माण झालेला हा वाद मिटवावा, समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी राज्यातील सुमारे २५० साहित्यिक, कवी आणि पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.काही तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग आणि कवी दिनकर मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी या गोष्टी आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात. कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत, याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.ना. धों. महानोर, रामदास भटकळ, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, किशोर कदम (सौमित्र), हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, हेमंत दिवटे, जयंत पवार, गणेश विसपुते, संतोष पद्माकर पवार, प्रज्ञा दया पवार, निरजा, सुमती लांडे, अभय सरदेसाई, दा. गो. काळे, बाबा भांड, इग्नेशियस डायस, रणधीर शिंदे, चिन्मयी सुमित राघवन, सचिन केतकर, सलील वाघ, सुधाकर गायधनी, आश्लेषा महाजन, समीर दळवी, खलील मोमीन, नीलिमा कुलकर्णी आदींसह सुमारे अडीचशे लेखक, कवींचा यामध्ये समावेश आहे. -------------कविता वगळण्याचा निर्णय हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी गोष्ट आहे. आदिवासी स्त्रीचा संदर्भ कवितेच्या ओघात आला आहे. यामध्ये स्त्रीला कमी लेखण्याचा अथवा स्त्री उपलब्ध आहे, असे दाखवण्याचा कोणताही हेतू नाही. हा कवितासंग्रह चार-पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. इतक्या वर्षात तो वाचला गेला नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही. अभ्यासक्रमात आल्यानंतर अचानक शोध लागल्याप्रमाणे या कवितेला विरोध केला जात आहे. याबाबत अस्मितेचा प्रश्न निर्माण करुण काही संघटनांकडून राजकारण केले जात आहे. स्तन हा इतर अवयवांप्रमाणेच एक अवयव आहे. मग त्याबाबत सोवळेपणा का पाळायचा? निषिध्द मानण्याची काय गरज? असे विचार घेऊन आपण कोठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.- आश्लेषा महाजन, कवयित्री-------------------कविता समजून न घेता केवळ आरोप करणे हे दबावतंत्र आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. लेखकाला आपले मत मांडण्याचे, लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. लेखकाला समजून घेता आले तरच समाजातील संस्कृती निरोगी आहे, असे म्हणता येईल. अराजकसदृश वादविवाद निर्माण होणार असतील तर ते कीड लागलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. - गणेश विसपुते, भाषा अभ्यासक
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चिंताजनक : साहित्यिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 8:31 PM
समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी....
ठळक मुद्देराज्य भयमुक्त करण्याची मागणीलेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य ही चिंतेची बाब राज्यातील सुमारे २५० साहित्यिक, कवी आणि पत्रकारांचा समावेश