पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आलेली शहरातील विविध विकास कामे सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मंजूरी द्यावी. या विकास कामांसाठी आवश्यक महसूल महापालिका स्तरावर उभारला जाईल, असे पत्र पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे सादर केले आहे़ कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे महापालिकांनी अत्यावश्यक विकास कामांवर केवळ ३३ टक्केच खर्च करावा असे आदेश दिले होते. यामुळे गेल्या साडेचार महिन्यात पुणे महापालिकेकडून कोरोना संदर्भातील उपाययोजनांवरील खर्च व पावसाळी कामे वगळता अन्य कुठल्याही नव्या विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या नाहीत. दरम्यानच्या काळात शहरात रखडलेली विकास कामे सुरू करण्याबाबत पालिकेतील सत्ताधारी पक्षाने राज्य शासनाकडे वारंवार विनंती केली होती़. आता मिळकत करातून व अन्य स्त्रोतातून जुलैअखेरपर्यंत पालिकेने दीड हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे़ व पुढील सहा सात महिन्यात पालिकेला आणखी ५ हजार कोटी रूपये उत्पन्न मिळेल असा विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी द्यावी़ अशी विनंती राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे. तर या विकास कामांसाठीच्या महसूली खर्चाची तरतूद पालिका स्तरावरच आम्ही करू असेही त्यांनी या पत्रात आश्वस्त करण्याचे प्रशासनास सांगितले आहे. यानुसार महापालिका प्रशासनाने राज्य शासनास पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली तरी, राज्य शासनाची मान्यता आल्यावरच संबंधित विकास कामांची वर्क ऑर्डर काढली जाईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. --------------------------------
पुणे शहरातील विकास कामे सुरू करण्यासाठी महापालिकेचे शासनाला पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:32 PM
२०२०-२१ च्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी द्यावी..
ठळक मुद्देराज्य शासनाची मान्यता आल्यावरच संबंधित विकास कामांची वर्क ऑर्डर काढली जाईल