तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरासाठी वरदान ठरलेल्या तेरुंगण येथील पाझर तलावात पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. तलावामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून भीमाशंकर परिसरात पाणीटंचाई जाणवणार आहे.भीमाशंकर परिसरामध्ये असणारा तेरुंगण येथील पाझर तलाव या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला होता. यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असला तरी या पाझर तलावामधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू असल्यामुळे पाझर तलावामध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे. गेले आठ-नऊ वर्षांपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात असणाऱ्या तेरुंगण येथील पाझर तलावामुळे म्हतारबाचीवाडी, तेरुंगण, निगडाळे, भीमाशंकर, ढगेवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने हा पाझर तलाव भीमाशंकर व परिसरासाठी वरदान ठरला होता. उन्हाळ्यात जनावरांचा पाणी प्रश्नही मिटत होता. भीमाशंकर व परिसरामध्ये यापूर्वी पावसाळा सोडल्यास टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. या परिसरातील नागरिकांन मैलोन्मैल पायपीट करावी लागत होती. श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरासाठी वर्षभर ५.५६ एमएसएफटी पाणी लागणार असल्याची गरज लक्षात घेऊन या तलावाला ४ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. छोटे पाटबंधारे विभागाकडून येथील पाझर तलावाची पाणी साठवणक्षमता वाढविण्यासाठी सहा वर्षांपूर्वी तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले होते.ऐन उन्हाळ्याच्या सुटीतच ही पाणीटंचाई भेडसावल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकरला येणाऱ्या भाविक व पर्यटकांना या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील पाझर तलावातून ज्या ज्या गावांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्या-त्या गावांच्यादरम्यान काढण्यात आलेल्या व्हॉॅल्व्हमधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
तेरुंगण तलावाची पातळी घटली
By admin | Published: April 27, 2017 4:42 AM