पुणे : “मानव हा प्रकृती आणि संस्कृतीच्या मिलाफातून तयार झाला असून, यात वाचनसंस्कृतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात समाजाच्या भौतिक समृद्धीच्या बरोबरीने नैतिक उंची वाढणे गरजेचे आहे. व्यवस्थेमधून अडथळे निर्माण होण्यापेक्षा मोकळीक दिली गेली पाहिजे. या दृष्टीने सार्वजनिक वाचनालये सामाजिक बुद्धिमत्तेची केंद्रे झाली पाहिजेत,” असे मत भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचा १७३ वा वर्धापनदिन रविवारी (दि. ७) झाला. संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ग्रंथसूचीकरण कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिल्पा सबनीस यांना वाचन चळवळीतील ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ तर कोविड काळातील कार्याबद्दल अरुण जंगम यांना ‘आदर्श सामाजिक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. गंधर्व वेद प्रकाशन या संस्थेला संतसाहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या खाडिलकर बंधूंनी पुरस्कार स्वीकारला. संस्थेच्या महत्वाकांक्षी अंकेक्षण (डिजिटायझेशन) प्रकल्पातील अंकेक्षित ग्रंथांचे उद्घाटन रावत यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुमारे सव्वाशे दुर्मीळ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.
रावत म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन समाजसुधारकांनी समाजातील अडचणी, त्रुटी यावर विचार केला. संस्थानिष्ठ, पोथीनिष्ठ आणि व्यक्तीनिष्ठ साचेबंद पद्धतीत बदल घडवून आणण्याचे काम समाजसुधारकांनी केले आणि समाजाने पुन्हा उभारी घेतली. भारतातील या प्रबोधन युगाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजे पुणे नगर वाचन मंदिर संस्था आहे.
शिल्पा सबनीस यांनी संस्थेने सूचीसारख्या विषयाला दिलेला सन्मान म्हणजे न्या. रानडे व लोकहितवादींचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. अरूण जंगम म्हणाले की, मृतदेहांच्या अंतिम संस्काराचे कार्य ही सेवेची संधी मानली आणि कोणताही विचार न करता कार्य केले. स्वाती ताडफळे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र चौधरी यांनी आभार मानले.