पुणे : कोरोना काळात ऑफलाइन शिक्षण बंद असल्यामुळे विद्यार्थी घरी बसून केवळ ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत, मात्र, शाळांकडून ग्रंथालय व प्रयोगशाळेचे शुल्क भरण्याबाबत पालकांवर दबाव टाकला जात आहे. नांदेड सिटी भागातील एका नामांकित शाळेने विद्यार्थ्यांनी हे शुल्क भरले नाही म्हणून त्यांचे ऑनलाईन शिक्षणच बंद केल्याची घटना समोर आले आहे.
कोराेनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे वर्षभरापासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालय, प्रयोगशाळा , जिमखाना आदींचा वापर केला नाही. विद्यार्थ्यांनी ज्या सुविधांचा लाभच घेतला नाही त्या सुविधांचे शुल्क का द्यावे? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. परंतु, उच्च न्यायालयाने शुल्काबाबत दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन शाळांकडून शंभर टक्के शुल्क वसुली केले जात असल्याचे दिसून येत आहे. शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर न वापरलेल्या सुविधांचे शुल्क सुद्धा द्यावे? लागेल. केवळ मागील वर्षाचेच नाही तर; पुढील वर्षाचे सुद्धा भरावे लागेल, अन्यथा विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले जाईल, असा दबावा पालकांवर आणला जात असल्याचे काही पालकांनी सांगितले.
शनिवारी नांदेड सिटी परिसरातील एका नामांकित शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले.याबाबतचा विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळा प्रशासनाने प्रवेशद्वारा बाहेरच उभे ठेवले. ऑनलाइन शिक्षणामुळे शाळेचा खर्च काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे शाळेने न वापरलेल्या सुविधांचे शुल्क आकारू नये, अशी पालकांची मागणी आहे.मात्र, शुल्क न भरणा-या पालकांच्या पाल्याचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळेच्या प्रवेश द्वारासमोर गर्दी करून शनिवारी शाळा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
शाळेने प्रथमतः विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्क आणि शिक्षकांना दिले जाणारे वेतन तसेच इतर सोयी-सुविधांवर केला जाणारा खर्च याचा तपशील उघड करावा. त्यानंतरच या नामांकित शाळेने इतर शुल्क आकारावे,अशी मागणी पालकांनी केली आहे.