- राहुल शिंदेपुणे : राज्यात गुटखा,पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र,अवैध वाहतूक करून हे पदार्थ पुण्यासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरामध्ये विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे या पुढील काळात प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाचा व वाहनाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास अनेक अडचणी येत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कर्नाटक, गुजरात आदी राज्यातून कोट्यावधी रुपयांचा गुटख्या पुणे शहर व परिसरात दाखल झाल्याचा घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुणे शहरात अनेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी अन्न व औषध प्रशासनातर्फे 75 ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्यात आली. त्यात 1 कोटी 19 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच काही महिन्यांपूर्वी शिरूर, बारामतीसह येरवडा,निगडी,पिंपरी चिंचवड परिसरात एफडीएकडून गुटख्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही गुटख्याची अवैध वाहतुक व विक्री होत असल्याचे समोर आले आहे. केवळ ट्रक किंवा टेम्पोमधूनच नाही तर प्रवासी वाहतूक करणा-या बस मधूनही गुटख्याची वाहतूक होत असल्याचे एफडीएच्या कारवाईत अढळून आले आहे.
गुटखा बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनासह एफडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहानाचा वाहतूक परवाना आणि चालकाचा परवाना दोन्ही रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, याबाबत एफडीकडून शासनाकडे व परिवहन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच या प्रस्तावास मान्यता मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. शासनाने नुकताच हा प्रस्ताव मान्य केला आहे. त्यामुळे गुटखा,पानमसाला आदी प्रतिबंधीत मालाची वाहतूक करणा-यांवर परिवहन विभागाकडूनही कठोर कारवाई केली जाणार आहे.
प्रतिबंधित अन्न पदार्थाची मोटर वाहनातून वाहतूक होत असल्याचे आढळल्याने प्रकरण न्यायालयात दाखल करावे. तसेच मोटर वाहन कायद्या कलम 19 (1)(सी)अन्वये वाहन चालकास वाहन चालविण्यापासून प्रतिबंधित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला सुचित करावे, असे परिपत्रक अन्न व औषध प्रशासनक विभागाकडून काढण्यात आले आहे. प्रतिबंधित अन्न पदार्थाची वाहतूक करणारी वाहने राज्याच्या मोटर वाहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर किंवा इतर नियमित वाहन तपासणीच्या वेळी निदर्शनास आल्यास सीमा तपासणी अधिका-याकडून वाहनाच्या परवान्यावर कारवाईसाठी ताब्यात घेतले जाते. एफडीएच्या अधिका-यांनी संबंधित अधिका-यांशी संपर्क साधावा,असेही एफडीएच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.