पुणे : कोरोनाकाळात औषध विक्रीच्या व्यवसायात वाढ झाली आहे. कोरोनाच्या लक्षणांना घाबरलेले नागरिक अनेकदा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधे खरेदी करतात. चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास अथवा जुन्याच चिठ्ठीच्या आधारे पुन्हा औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे. अशी औषधे देणे, बंदी असलेली औषधे विकणे, बिलांची टॅली न होणे अशा विविध कारणांनी अन्न आणि औषध प्रशासनातर्फे पुणे जिल्ह्यामध्ये १४६ जणांचे परवाने निलंबित, तर ३३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधविक्रेते पेनकिलरही विकू शकत नाहीत. आपल्या देशातही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र, औषध विक्रेत्यांकडून बरेचदा हे नियम, कायदे पाळले जात नाहीत. नागरिकही केमिस्टकडून औषधे घेऊन डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च वाचवतात. कोरोना काळात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्याला कोरोना झाला आहे की काय या भीतीने नागरिक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. तात्पुरता आराम मिळावा, यासाठी अँटिबायोटिक घेण्यावर भर देतात. अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषध विक्रेत्यांची नियमितपणे तपासणी केली जाते. चिठ्ठीशिवाय औषधे देणे, बिलांमधील फेरफार अशा विविध कारणांमुळे प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली आहे.
------------------------------
अशी झाली कारवाई
परवाने निलंबित परवाने रद्द
परिमंडळ-१ ४७ ६ परिमंडळ-२ ४० १८
परिमंडळ-३ ३६ ८
परिमंडळ-४ २३ १
--------------------------------------------
एकूण १४६ ३३
------------------------
अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षकांकडून औषध दुकानांची नियमितपणे तपासणी केली जाते. बिलांची रक्कम न जुळणे, झोपेच्या गोळ्या परस्पर देणे, कागदपत्रांचे गणित न जुळणे अशा परिस्थितीत परवाने निलंबित किंवा रद्द केले जातात.
- डॉ. एस. बी. पाटील, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन
---------------------
कारणाशिवाय गरज नसताना अँटिबायोटिक्स घेतल्यास बॅकटेरियल रेझिस्टन्स निर्माण होतो. केमिस्टकडून थेट औषधे घेऊन रुग्ण डॉक्टरांच्या फीसाठी होणारा खर्च वाचवतात. औषधे विकली गेल्याने केमिस्टचाही फायदा होतो. औषधांचा डोस, त्याचे प्रमाण, त्यातील घटक यातील योग्यता-अयोग्यता पडताळून पहिली जात नाही. एखाद्या अँटिबायोटिक्सचा उपयोग झाला की वर्षानुवर्षे ती औषधे मनाने घेतली जातात. कालांतराने त्याचा प्रभाव कमी होतो. परदेशात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय साधी पेनकिलरही मिळत नाही. आपल्याकडेही कायद्याचा बडगा उगारणे आवश्यक आहे.
- डॉ. मीनल साळुंखे, जनरल फिजिशियन