पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड होणार आहे. २५ रोजी ते पदभार स्वीकारतील.लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी लष्कराच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर उपलष्करप्रमुखपद रिक्त झाले होते. चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांच्या अध्यक्षतेखाली सैन्य व्यवहार विभागामार्फत जारी केलेल्या वरिष्ठ लष्करी नेमणुकीचा हा पहिला आदेश आहे.लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पंजाबमधील कपुरथला येथील आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांची पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी निवड झाली. तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर त्यांनी डेहराडून येथील नॅशनल मिलिटरी अॅकॅडमी येथील प्रशिक्षण पूर्ण केले. जून १९८१ मध्ये ते जाट रेजिमेंटमध्ये रुजू झाले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे माजी कमांडंट लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी निवृत्त झाल्यानंतर, लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी ११ आॅक्टोबर २०१८ रोजी दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. केरळ आणि सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात ‘आॅपरेशनल सेंटर’ची स्थापना झाली होती. भारत-रशिया यांच्या दरम्यान झालेला इंद्रा युद्ध सराव, तसेच राजस्थान येथे घेण्यात आलेला सिंधू सुदर्शन युद्ध सराव आणि भारत-श्रीलंका यांच्या दरम्यान झालेला युद्ध सराव यासारख्या अनेक मोहिमा सैनी यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या.सैनी हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी दिल्ली येथील सैन्य मुख्यालयात मनुष्यबळ विभागाच्या संचालकपदाची धुरा सांभाळली आहे. इराक आणि कुवेतमध्ये संयुक्तराष्ट्रसंघाच्या मोहिमेत डेप्युटी चीफ मिलिटरी पर्सनल आॅफिसर, मंगोलिया येथील जागतिक शांतता परिषद, आॅस्ट्रेलिया येथील दहशतवादविरोधी लष्करी सराव अशा विविध ठिकाणी त्यांनी काम पाहिले आहे.
लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी होणार उपलष्करप्रमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 4:55 AM