पुणे : कोरोनामुळे हातचा रोजगार गेला, आता कुणी काम देईना, यापुढे जगायचं कसं, दोन वेळच्या भुकेच करायचं काय म्हणून त्या शेत मजुरी करणाऱ्या कुटुंंबाने जीवन संपवण्याच्या उद्देशाने विहीरीत उडी मारली.तिथेच शेतात काम करणाऱ्या तरुणाच्या कानावर या उडी मारणाऱ्या कुटुंबाचा आक्रोश पडला.. त्याने मग क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा जीव धोक्यात घालत विहिरीत उडी मारत या चौघांना जीवदान दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला. ।मात्र या कोरोनामुळे खूप कुटुंबांना आर्थिक फटका बसला. याच नैराश्यामुळे आत्महत्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शेतमजुरीच्या कामासाठी संगमनेरहुन जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आलेल्या कुटुंबाने केला. पतीने आपल्या पत्नी अन् दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला.मात्र एका तरुणाने प्रसंगावधनता दाखवल्याने या चार जणांचे जीव वाचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मूळचे संगमनेरच्या असलेल्या एक कुटुंब हाताला काही काम मिळेल या आशेने जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे आले होते. परंतु, जवळचे पैसे संपल्याने या कुटुंबाची अवस्था फार कठीण झाली होती. त्यामुळे आता यापुढे उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न उभा राहिल्याने या कुटुंबातील व्यक्तीने आपल्या पत्नी व दोन लहान जीवांसह विहिरीत उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेच शेतात काम करत असलेल्या दीपक सूर्यवंशी या तरुणाला या चौघांचा आक्रोश कानावर पडल्याने त्याने क्षणाचाही विलंब न करता धाडसी वृत्ती दाखवत तात्काळ विहिरीत उडी मारत या चौघांना बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून ह्या तरुणामुळे कुटुंबाला जीवदान मिळाले.