कल्याणराव आवताडे
धायरी : माणूस प्राणी सोडला तर इतर कुठलाही प्राणी त्याच्या वाट्याला गेल्याशिवाय आपल्यावर हल्ला करत नाही. नागांबाबतही तसंच काहीसं आहे. पण नाग दिसला की अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण मुंबई-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरीपूलामध्ये अडकलेल्या नागाला वाचवण्यासाठी सर्पमित्रानं १३० फूट उंच असलेल्या पुलावरून जीवाची बाजी लावत नागाला सुखरूपपणे बाहेर काढल्याचे पाहावयास मिळाले. नागाची सुटका होताच, उपस्थित सर्वांनाच 'आनंद' झाला. यावेळी ग्रामस्थांनी सर्पमित्र आनंद बनसोडेचे कौतुक करत आभारही मानले.
शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान एका ग्रामस्थाला दरिपूलावरील दोन रस्त्यांच्यामध्ये असणाऱ्या जाळीमध्ये नाग अडकल्याचे दिसले, त्यांनी त्वरित सामाजिक कार्यकर्ते आगंद लिपाणे यांना ही बाब सांगितली. लिपाणे यांनी वाईल्ड ऍनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे अध्यक्ष आनंद अडसूळ व सर्पमित्र सोमेश जांभळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, जमिनीपासून १३० उंचावर असणाऱ्या महामार्गाच्या दरी पुलावरील दोन रस्त्यांच्या मधील एका जाळीमध्ये नाग अडकल्याने त्यात उतरणे मुश्किल होते. दरम्यान अनिशमन दलाच्या जवानांना बोलावून दोन रस्त्यांच्या मधील भागात शिडी लावून खाली उतरून नागाला बाहेर काढण्याचे ठरले. त्यावेळी सर्पमित्र आनंद अडसूळ यांच्या पोटाला दोरी बांधून शिडीच्या साहाय्याने त्यांना खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांनी चार फूट लांबीच्या विषारी नागाला जाळीतून अलगद बाहेर काढले. सनसिटी अग्निशमन दलाचे जवान ,आगंद लिपाणे, उपसरपंच बंटी लिपाणे, जालिंदर जांभळे आदींनी तत्परतेने मदत केल्याने नागाला जीवनदान मिळाले. त्यानंतर नागाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
धोका पत्करून दिले नागाला जीवनदानजाळीत अडकलेल्या नागाला सोडविण्यासाठी सर्पमित्र आनंद अडसूळ यांच्या पोटाला दोरी बांधून त्यांना शिडीच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले. मात्र उतरताना थोडा जरी तोल गेला असता तरी खाली १३० फूट उंचीच्या दरीत पडण्याची भीती होती. मात्र अग्निशमन दलाचे जवान, तसेच उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे नागाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात सर्पमित्र अडसूळ यांना यश आले.
सर्पमित्र आनंद अडसूळकदाचित गेल्या दोन - तीन दिवसांपासून त्या जाळीत नाग अडकला असावा, कारण नागाला बाहेर काढल्यानंतर त्याच्यात अशक्तपणा जाणवत होता. मात्र प्राथमिक उपचार करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे. नागाला वाचविण्याची ग्रामस्थांची धडपड पाहून मन खरंच भारावून गेलं.