खेड्या गावात राहून सापांविषयी जाणून घेतले आणि हजारो सापांना जीवदान देण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्या म्हणजे सुजाता बोरकर. गेली २० वर्षांपासून त्या सापांना पकडून निसर्गात सोडत आहेत. सर्पजीवनदायिनी असेच त्यांना म्हटले जाते. सुजाता रामचंद्र बोरकर, नारायणपूर
—————————-
लहानपणी साप चावल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. ते दृश्य पाहिल्यानंतर सापावर काम करायचे ठरवले. तेव्हा त्यांच्या गावी वन विभागाचे गोपाळ ननावरे साप पकडायला यायचे. त्यांच्याकडून साप कसा पकडायचा याची माहिती त्यांनी घेतली. सापाविषयी पुस्तके वाचली. त्यातून थोडीफार माहिती समजली. त्यानंतर पहिल्यांदाच एका ठिकाणी साप पकडायला त्या गेल्या. तेव्हा तो नाग होता. पण तिथे घाबरून चालणार नव्हते, म्हणून त्यांनी एका काठीने त्या नागाला हात न लावता एका डब्यात पकडले. त्यानंतर त्यांची भीती गेली आणि मग साप पकडायला सुरुवात झाली. आजपर्यंत हजारो साप पकडून निसर्गात सोडले आहेत.
साप दिसल्यानंतर नागरिक घाबरतात. त्याला मारून टाकतात. पण सुजाता त्याबाबत जनजागृती करत आहेत. साप मारू नका, त्यांना निसर्गात सोडून द्या, असे आवाहन त्या करतात. शाळांमध्ये जाऊन सापांची माहिती देतात. सापांची माहिती देण्यासाठी त्या महाराष्ट्रभर फिरल्या आहेत. २००१ पासून त्या सापांना पकडतात. त्या साप पकडायला शिकल्यानंतर आता त्यांच्या भाच्याला प्रशिक्षण देत आहेत. तसेच लोकांमध्ये जाऊन याबाबत माहिती देतात.
सापांसोबतच त्या पक्षी, प्राणी यांनाही मदत करतात. एखादा पक्षी, प्राणी जखमी असेल, तर त्यावर उपचार करतात. त्यानंतर वन विभाग किंवा निसर्गात सोडतात. लहान मुलांना वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगतात. ज्यांना रोपं हवी असतील, त्यांना ते देतात. त्यामुळे निसर्गसंवर्धनाचे काम त्या अविरहीत करत आहेत.
——————
...अग्नी दिल्यावर त्याचे पाय हलत होते !
मी खूप लहान होते, तेव्हा आमच्या वस्तीवर एका मुलाला साप चावला. तेव्हा सापाविषयी अधिक माहिती नव्हती. तसेच लोकांमध्ये जागृती नव्हती. तो मुलगा बेशुद्ध झाला होता. बराच वेळ वस्तीवर तो मुलगा बेशुद्ध पडून होता. त्या लोकांना वाटले की, साप चावल्याने हा मरण पावला आहे. त्यामुळे त्या मुलाला अग्नी देण्यात आला. पण जेव्हा अग्नी पेटला, त्यानंतर त्या मुलाचे पाय हलताना दिसले. पण त्या मुलाला नंतर वाचवता आले नाही. ती घटना माझ्या मनावर कोरली गेली. तेव्हापासून सापाविषयी जाणून घेऊ लागले. जर तेव्हा सापांविषयी माहिती असती, तर तो मुलगा वाचला असता, अशा भावना सुजाता बोरकर यांनी व्यक्त केल्या.