पुणे : पत्नीच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलल्याने कोयता व सळईने मारहाण करून खून करणा-या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे.
विठ्ठल दिगंबर राऊत (वय २६, रा. एखतपुर, ता. पुरंदर) आणि संतोष शामराव देशमुख (वय ३५, रा. येवलेवाडी) अशी शिक्षा जन्मठेप झालेल्या दोघांची नावे आहेत. कोंडीराम नाथा काळे (वय ५८, रा. एखतपुर, ता. पुरंदर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा गोरख (वय २६) याने याबाबत सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १९ जानेवारी २०१५ रोजी रात्री नऊच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील एखतपुर गावत घडली होती. कोंडीराम काळे आणि आरोपी विठ्ठल, संतोष हे तिघे एखतपुर येथील एकाच मालकाकडे कामाला होते. घटनेच्या दिवशी तिघे एकाच ठिकाणी बसले होते. त्यावेळी कोंडीराम हे विठ्ठल राऊत याच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलले. त्यावेळी विठ्ठल आणि संतोष यांनी लोखंडी कोयता आणि सळईने मारून त्यांचा खून केला होता.
सासवड पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी काम पाहिले. भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भारते यांनी या प्रकरणाचा तपास केला.
न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत वाघमारे यांनी सहाय केले. कोंडीराम हे दलित असल्याने अॅट्रॉसिटी आणि खून अशा दोन कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने दोघांना खूननुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर अॅट्रॉसिटी प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.