खेड-शिवापूर (पुणे) : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव दिनेश हरी भालेराव (रा.शिवापूर, ता.हवेली) असे आहे.
राजगड पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दिनेश भालेराव याने अल्पवयीन मुलीला अनेक वेळा बहाण्याने व धमकावून डोंगरात नेऊन वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. राजगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर, दिनेश भालेराव याला अटक करण्यात आली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे वकील किरण साळवी यांनी कामकाज पाहिले. या गुन्ह्यात प्रभारी अधिकारी सचिन पाटील, केस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक समीर कदम आणि पोलीस कर्मचारी मंगेश कुंभार यांनी कामकाज पाहिले. भालेराव याला शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या खंडपीठाने भालेराव याला जन्मठेप आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.