पुणे : प्रेयसीसमवेत फिरतो म्हणून खून करून शिर धडावेगळे करीत कॅनोलमध्ये टाकून देणाऱ्या नराधमाला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावली.
रमझान ईदच्या दिवशी शिरकुर्मा खाण्याच्या बहाण्याने तो मयत व्यक्तीला घेऊन गेला. त्यानंतर सत्तुरने वार करून खून केला. कोंढवा येथे त्याचा मृतदेह मिळून आला. मात्र, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे शिर आणि शिस्न कापून लाल रंगाच्या बॅगेत भरून स्वारगेट येथील कॅनॉलमध्ये टाकून दिले होते. या बॅगेत गुन्ह्यात वापरलेले सत्तुर आणि मयताचा मोबाइल, आधार आणि पॅन कार्डही ठेवण्यात आले होते.
निजाम आसगर हाशमी (वय 19, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. उमेश भीमराव इंगळे असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक बसवराज उजने यांनी फिर्याद दिली आहे. ही खळबळजनक घटना कोंढवा येथे 19 जून 2018 रोजी धड नसलेला मृतदेह मिळून आल्यानंतर उघड झाली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अँड. नामदेव तरळगट्टी यांनी काम पाहिले. त्यांनी 24 साक्षीदार तपासले. यामध्ये परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. हाशमी याचे एका तरूणीशी प्रेमसंबंध होते. उमेश नेहमी तिच्यासोबत फिरतो. तिच्याशी लगट करतो, अंगाला चिटकतो, यावरून दोघांची भांडणे झाली होती. याचा राग धरून त्याने सत्तूरला धार लावून आणली. हे कृत्य केले. तत्कालीन कोंढवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संतोष शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक समाधान मचाले, कोर्ट अंमलदार म्हणून सहायक पोलीस फौजदार महेश जगताप यांनी काम पाहिले. त्यांना शिपाई अंकुश केंगले यांनी मदत केली.