पुणे : माशाचे जेवण न बनविल्याचा रागातून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे यांनी सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. संतोष रुपा वाघमारे (वय ४०) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. पार्बता संतोष वाघमारे (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत विजय बंडु लालगुडे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. २ एप्रिल २०१६ रोजी रात्री सव्वा दहाच्या दरम्यान ही घटना घडली. लालगुडे यांचा शेतीचा व्यवसाय असून, संतोष व पार्बता हे दोघे त्यांच्या शेतामध्ये मजुरीचे काम करायचे. पार्बता हीला दारुचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी संतोष व पार्बता हे दोघे मासे घेण्यासाठी कामशेत येथे आले होते. त्यावेळी संतोष हा माशे घेत असताना पार्बता हीने त्याची नजर चुकवून दारू पिली. घरी परत आल्यानंतर दारूच्या नशेत पार्बता ही स्वयंपाक न करताच झोपली. त्यामुळे माशाचे जेवण न केल्याच्या रागातून संतोष याने पार्बता हीला सरपणातील लाकडी दांडक्याने डोक्यात, पायावर मारहाण करून तीचा खून केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादीची साक्ष, वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. हांडे यांनी युक्तीवादा दरम्यान केली. त्यानुसार न्यायालयाने संतोष याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
माशांचे जेवण न बनविल्याच्या रागातून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 8:20 PM