पुणे: पत्नीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने वरंधा घाटात नेऊन दरीत ढकलून देत तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी हा आदेश दिला. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.
सुमारे साडेआठ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. विक्रम शंकर शेवते (वय ४०, रा. मांजरी रस्ता, हडपसर) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने पत्नी सुनीता हिचा खून केला होता. त्याबाबत सुनीताच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना १३ जुलै २०१२ रोजी घडली. विक्रम याचा सुनीता यांच्याशी विवाह झाला होता. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी सुनीता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असे. त्रास असह्य झाल्याने सुनीता यांच्या वडिलांनी म्हणजे फिर्यार्दीनी १ लाख रुपये सासरच्या लोकांना दिले होते.त्यानंतरही माहेरहून पैसे आणण्यासाठी त्यांना त्रास दिला जात असे. पैशाची मागणी पूर्ण करत नसल्याने टाटा सफारी गाडीतून फिरविण्याच्या बहाण्याने भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट येथे घेऊन गेले. तेथील कावळाकडा येथे खाली उतरून दरीत ढकलून देऊन तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वानवडी पोलिसांनी तपास करून न्यायायलात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना शेवते याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड, १ वर्षे साधा कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी १९ साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलीस निरीक्षक अजित खडके यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल पी.पी.पवार, ए.एस.गायकवाड आणि उपनिरीक्षक पांडे यांनी मदत केली.