पुणे : तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केल्याप्रकरणी न्यायालयाने ६ जणांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीय एस. एच. ग्वालानी यांनी हा निर्णय दिला.
बापू शिवाजी कांबळे (वय ४६), सूरज नारायण माने (वय २५), विजय सुरेश गुंड (वय २५), दिलीप गजेंद्र सोनवणे (वय ४४), संतोष दामू सुतार (वय ३३, सर्व रा. अप्पर ओटा, इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि अमित हिरामण धोत्रे (वय २७, रा. पर्वती पायथा, दांडेकर पूल) असे शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
या आरोपींनी दीपक श्रीमंत सकट (वय २४, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) याचा ९ मार्च २०१४ रोजी खुन केला होता. संदीप सकट यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
बापू कांबळे याच्या मुलीचे दीपक याचा मित्र आलोक दळवी याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती आरोपींना समजली होती. तसेच दीपक हा त्याला फूस लावत होता. कांबळे याला हे समजल्यावर त्याने साथीदारांच्या मदतीने बिबवेवाडीतील महालक्ष्मी मंदिराजवळ ९ मार्च २०१४ रोजी रात्री साउेनऊ वाजता दीपकचा खून केला होता. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक एम. बी.खंडाळे यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी १३ साक्षीदार तपासले.
फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार व घटनेनंतर आरोपीच्या कपड्यांवर मयताचे रक्ताचे डाग इत्यादी पुरावा, आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध होण्यास पुरेसा आहे हा युक्तिवाद अॅड. विलास घोगरे पाटील यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बिववेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय पुणेकर यांनी न्यायालयीन कामात मदत केली.