पुणे : नातीगोती मध्ये दिव्यांग मुलाच्या बापाची तर चौकट राजा, रात्र आरंभ मधून मानसिक रूग्णाच्या भूमिका साकार केल्या. मी त्या त्या व्यक्तींची आयुष्य जगलो. मात्र आम्ही जे जगतो ते आभासाचे जग असते. परंतु, वेदनांनी भरलेल्या आयुष्यात आनंदाचा कसा मिळवायचा हा प्रश्न दिव्यांग किंवा मनोरुग्ण माणसांना खूप कमी वेळा पडतो. त्यांच्या चेहºयावर कायम उमटेलेली असते प्रसन्न लकेर...ही अशी आयुष्य ख-या अर्थाने अनेकांच्या आयुष्याला नवी उभारी देण्याचे काम करते. अशा शब्दांत प्रसिध्द अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी स्किझोफ्रेनिया या आजारातून सावरलेल्या व्यक्तींप्रती कौतकोद्गार काढले. निमित्त होते...जागतिक स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त परिवर्तन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मानस रंग या विशेष कार्यक्रमाचे. स्किझोफ्रेनिया या आजारातून सावरलेल्या काही व्यक्तींनी गाणी, नाटुकली, कविता अशा सादर केलेल्या विभिन्न कलाविष्कारांमधून उपस्थितांच्या मनपटलावर आश्चर्याचे सुखद रंग उमटले. यात आज रपट जाए. सांज ये गोकुळी, यदी तोर डाकशुने केऊ ना आशे अशा गीतांच्या अवीट गीतांचा सहभाग होता. एखाद्या सामान्य व्यक्तीसारखे त्यांनी केलेले सादरीकरण त्यांच्यातील परिवर्तनाची साक्ष देणारे ठरले. यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, परिवर्तनच्या शैला दाभोळकर, मानसोपचार तज्ञ डॉ. अमित नूलकर उपस्थित होते. प्रभावळकर म्हणाले, पाडूया चला रे, भिंत ही मध्ये आड येणारी, या मनामनामध्ये बांधूया एक वाट जाणारी...अशा अभिव्यक्तीमधून कलाकारांनी नकळतपणे अशा रूग्णांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी समाजाला दिली. या कलाविष्कारांनी जगण्याचा एक वेगळा अर्थ दिला. यातून स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक चित्रपटांमध्ये मानसिक रूग्णाच्या भूमिका करायला मिळाल्या, पण या कार्यक्रमाने जो अनुभव दिला. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच अतुल पेठे यांनी मानसरंगची भूमिका विशद केली. पेठे म्हणाले, समाजाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण चांगले असणे अत्यंत गरजेचे असते. समाजस्वास्थ्यासाठी मन चांगले लागते. आपल्या मनातील भावना अभिव्यक्त करण्यासाठी आपण कलेच्या अनेक माध्यमांचा वापर करत असतो. गायन, वादन, नाट्य या कलांच्या आधारे व्यक्त झाल्यावे मनाचा ताण कमी होतो. हे मानसशास्त्राने मान्य केले आहे. आजच्या पिढीतील तरूणांनी मनात गोष्टी दडवून न ठेवता अधिकाधिक व्यक्त होणे गरजेचे आहे. मानसिक रोग हे सध्याच्या पिढीपुढील मोठे आव्हान असून समाजाने त्यावर मात करायला हवी,असे त्यांनी सांगितले. ------------------------------------------ ----------------------------------------------------------------------------
चौकटी बाहेरचं जगणं आयुष्याला उभारी देतं : दिलीप प्रभावळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 2:02 PM
स्किझोफ्रेनिया या आजारातून सावरलेल्या काही व्यक्तींनी गाणी, नाटुकली, कविता अशा सादर केलेल्या विभिन्न कलाविष्कारांमधून उपस्थितांच्या मनपटलावर आश्चर्याचे सुखद रंग उमटले.
ठळक मुद्दे गायन, वादन, नाट्य या कलांच्या आधारे व्यक्त झाल्यावे मनाचा ताण कमीमानसिक रोग हे सध्याच्या पिढीपुढील मोठे आव्हान असून समाजाने त्यावर मात करायला हवी