पिंपरी : रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू असताना भीषण अपघात झाला. ट्रकने धडक दिल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तसेच चार जण जखमी झाले. यातील एक जण गंभीर जखमी आहे. मुंबई-बंगळूरु महामार्गावर रावेत येथे सोमवारी (दि. ३०) पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
सादिक हुसेन खान (वय ३०, रा. राजस्थान), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तसेच संदीप देशमुख हा यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासह प्रल्हाद यादव, भोला कुमार आणि अनिल कुमार (सर्व रा. राजस्थान) हे देखील जखमी झाले आहेत. रावेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सादीक खान आणि इतर कामगार हे सोमवारी पहाटे मुंबई-बंगळूर महामार्गावर रावेत येथील पुलाजवळ रस्त्यावर पांढरे पट्टे मारत होते. त्यावेळी भरधाव ट्रकने सादीक आणि इतर कामगारांना धडक दिली. यात सादीक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालक तेथून पळून गेला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सादीक आणि इतर कामगारांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच सादीक याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी पोलिसांना सांगितले.
रंगाने भाजून जखमीरस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. पांढरा रंग गरम स्वरुपात मशीनच्या माध्यमातून एका रेषेत रस्त्यावर ओतून पट्टा मारण्यात येतो. या अपघातात हा गरम असलेला पांढरा रंग सादीक आणि इतर कामगारांच्या अंगावर उडला. त्यामुळे भाजल्याने ते जखमी झाले.
इतरांच्या आयुष्याची रेषा केली मोठीवाहन चालविताना रस्त्याचा अंदाज यावा, रात्री रस्त्याची रुंदी सहज लक्षात यावी, तसेच वेग नियंत्रणात रहावा अशा विविध कारणांसाठी रस्त्यावर पांढरे पट्टे मारले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे पट्टे वाहनचालकांसाठी लाईफ लाईन सारखेच आहेत. दुसऱ्यांच्या सुरक्षित आयु्ष्यासाठी ही पांढरी रेष ओढत असलेल्या सादीक याची लाईफ लाईन अपघातामुळे बंद पडली.