पुणे : ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांना अमेरिकास्थित महाराष्ट्र फाउंडेशनच्या दिलीप वि. चित्रे स्मृती-साहित्य जीवनगौैरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. फाउंडेशनचा समाजकार्यातील जीवनगौरव पुरस्कार गजानन खातू यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांना विशेष कृतज्ञता पुरस्काराने गौैरवण्यात येणार आहे. चेन्नई येथील के. वीरमणी यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती-पुरस्कार दिला जाईल.
दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह प्रत्येकी असे कृतज्ञता आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार दिले जातात. सन २०२० या वर्षाचे साहित्यातील पाच, समाजकार्यातील पाच आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार अशा ११ पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. दरवर्षी साधना ट्रस्ट आणि मासूम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रत्यक्ष समारंभ आयोजित न करता ऑनलाइन वितरण केले जाणार आहे. ही तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.
साहित्यामध्ये सुबोध जावडेकर यांना ‘विज्ञानकथा’ या वाड:मय प्रकारासाठी वाड:मय प्रकार पुरस्कार, किरण येले यांना ‘तिसरा डुळा’ या कथासंग्रहासाठी ग्रंथ पुरस्कार (ललित), प्रदीप पुरंदरे यांना ‘पाण्याशप्पथ’ या ग्रंथासाठी वैैचारिक अपारंपरिक/ग्रंथ पुरस्कार, श्याम पेठकर यांना ‘तेरवं’ नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
समाजकार्यामध्ये अरुणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार, सुधाकर अनवले यांना कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार, चेतन साळवे यांना युवा पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. मनीषा गुप्ते, मुकुंद टाकसाळे, डॉ. रमेश अवस्थी, विनोद शिरसाठ, रवींद्र ठिपसे आणि गोपाळ नेवे यांचा समावेश असलेल्या भारतातील संयोजन समितीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.