पुणेः ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे प्रतिवर्षी महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही सांस्कृतिक जीवन समृद्ध करणाऱ्या व्यक्तीस जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांना तो देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे कळविण्यात आली.
पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे आहे. याआधी चतुरंगचा हा सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, श्री. पु. भागवत, नृत्यगुरू पार्वतीकुमार, नटवर्य भालचंद्र पेंढारकर, पं. सत्यदेव दुबे, डॉ. अशोक रानडे, रत्नाकर मतकरी, सदाशिवराव गोरक्षकर, विजया मेहता, सुहास बहुळकर, राजदत्त आणि लता मंगेशकर या मान्यवरांना दिला आहे.
यंदा या पुरस्कारासाठी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील सुधीर जोगळेकर, दीपक घैसास, डॉ. सागर देशपांडे, दीपक करंजीकर, सारंग दर्शने आणि धनश्री लेले यांच्या निवड समितीने ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांची एकमताने निवड केली आहे. हा पुरस्कार १९९१ पासून देण्यात येतो. या जीवनगौरव पुरस्काराच्या प्रदानाचा 'रंगसंमेलन सोहळा' यावर्षी दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म जुलै २९, १९२५मध्ये बेळगाव जिल्ह्यातील भोज येथे झाला. त्यांनी मुंबईतल्या सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतले. हास्यचित्रांकडे ओढा असलेल्या शिदंना हंस नियतकालिकाचे संपादक अनंत अंतरकर यांनी प्रोत्साहन दिले. हंस-मोहिनी मासिकांची मुखपृष्ठे शिदंनी केली आहेत. यातूनच शिदंचे नाव हास्यचित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. सहज, साध्या सोप्या शैलीतली त्यांची शब्दविरहित चित्रे भाषा, प्रांत, धर्म, वर्ग या सगळ्यांचा सीमा ओलांडतात.