विवेक भुसे
पुणे : ससून हॉस्पिटलमधील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय बिले मंजुर करुन देतो, असे सांगून लोकांकडून लिफ्टमनच २ टक्के लाच मागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून ३ हजारांची लाच घेताना या लिफ्टमनला पकडले.जालिंदर चंद्रकांत कुंभार (वय ५५) असे या लिफ्टमनचे नाव आहे.
याबाबत एका ५७ वर्षाच्या नोकरदाराने १ लाख ४३ हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी १ जूनमध्ये सादर केले होते. बिल मंजुर व्हावे यासाठी तक्रारदार हेलपाटे मारत होते. जालिंदर कुंभार हे लिफ्टमन असले तरी शिपायासारखे काम करतात. ते लोकांकडून बिले घेऊन ती मंजुर करुन देतो, असे सांगून लोकांकडून २ टक्के लाच घेत होते. तक्रारदार यांनाही त्यांनी ३ हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची २९ व ३० नोव्हेबर तसेच १८ व १९ डिसेंबर रोजी पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर बुधवारी ससून हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून लाच घेताना कुंभार याला सापळा रचून पकडले. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले, हवालदार नवनाथ वाळके, सरिता वेताळ, प्रवीण तावरे, चंद्रकांत कदम यांनी ही कारवाई केली. बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.