लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे रेल्वे स्थानकांवर लवकरचं लिफ्ट बसविले जाणार आहे. तसेच प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमे-यांच्या संख्येत देखील वाढ केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या दीड वर्षापासून पुणे स्थानकावरचे पादचारी पुलांना जोडणारे रॅम्प देखील पुन्हा खुले केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी डीआरएम कार्यालयात डीआरयूसीसी (विभागीय रेल्वे सल्लगार समिती सदस्य) ची रेल्वे अधिकाऱ्यासोबत बैठक झाली. यात विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ही माहिती दिली.
पुणे रेल्वे स्थानकांवर केवळ दोन सरकते जिने आहे. प्रवासी संख्या लक्षात घेता ते देखील अपुरे पडत आहे. शिवाय हे जिने केवळ फलाट एक व दोन आणि तीनवर उर्वरित फलाटावर मात्र नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन निखील काची या सदस्याने गुरुवारच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना रेणू शर्मा यांनी पुणे स्थानकावर लिफ्ट बसविणार असल्याचे सांगितले. सध्या स्थानकावर ६१ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात येणाऱ्या काळात आणखी वाढ केली जाणार आहे. शिवाय बंद अवस्थेतल्या दोन रॅम्प पुन्हा सुरू करणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिले असल्याचे काची यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या अन्य सदस्यांनी पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, जनरल तिकीट विक्री सुरू करावी आदी स्वरूपाची मागणी केली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला आदींसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.