सुवर्णा नवले, पिंपरीसभागृह रिकामे..., पण विद्युत दिवे सुरू. कार्यालयात कोणीच नाही, विद्युत दिवे सुरू. एसीची हवा पण येतेय; तुम्हाला वाटेल चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. नाही, हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिसणारे दृश्य आहे. त्यासाठी करदात्यांचे दरमहा आठ ते दहा लाख रुपये वाया जात आहेत. वीज बचत करण्यासाठी महापालिकेला जाग कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.महापालिकेला वीजबिलापोटी ८ ते १० लाख रुपये खर्च होत आहे. महापालिकेत २५ ते ३० विभाग आहेत. येथे शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. मात्र वीज बचतीकडे लक्ष देत नसल्याने महापालिकेला भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. महापालिकेच्या पर्यावरण, माध्यमिक शिक्षण, शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा व जलनि:स्सारण, नागरवस्ती विकास, करसंकलन आदी विभागांमधील काही उपविभागांमध्ये अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत सभागृह व कक्षातील विद्युत दिवे सर्रास सुरू असतात. अधिकाऱ्यांची कामे संपल्यानंतर विभागातून बाहेर पडल्यास कोणीही दिवे अथवा एसी बंद करीत नाही. महिन्याचे वीजबिल ८ ते १० लाखांच्या घरातमहापालिकेचे महिन्याचे विद्युत बिल हे ८ ते १० लाखांच्या घरात येत आहे. महापालिकेकडून दररोज १२०० ते १५०० युनिटचा वापर होत आहे. महापालिकेचे मार्च महिन्याचे युनिट हे ४२ हजार ७५० आहे. दर वर्षी ऊर्जा बचत करण्याचे १० टक्के उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र हे उद्दिष्ट गाठण्यात यश प्राप्त झाल्याचे दिसत नाही. विद्युत खर्चाच्या युनिटमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
वीजबचतीबाबत पालिकेत ‘अंधार’च!
By admin | Published: April 20, 2015 4:27 AM